Just another WordPress site

‘स्टील मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. जमशेद जे इराणींचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन; असिस्टंट ते एमडी हा त्यांचा प्रवास कसा झाला?

भारताचे ‘स्टील मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. जमशेद जे इराणींचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. पद्मभूषण जमशेद जे इराणींनी सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी जमशेदपूरमधील टाटा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. टाटा स्टीलने एक वक्तव्य जारी करत आपले माजी व्यवस्थापकीय संचालक जमशेद इराणींच्या निधनाची माहिती दिली आहे.

२०११ मध्ये टाटा स्टीलमधून निवृत्त

जमशेद जे इराणी ४३ वर्षांच्या करिअरनंतर जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले होते. त्यांनी कंपनीला वेगवेगळ्या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय पातळींवर ख्याती मिळवून दिली होती. टाटा स्टीलने म्हटले आहे, ‘एक दूरदृष्टी असलेल्या लीडरच्या रुपाने ते नेहमी आठवणीत राहतील’
टाटा स्टीलने पुढे म्हटले आहे, ‘जमशेद इराणींनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेच्या लिबरलायझेशनदरम्यान टाटा स्टीलचे नेृतृत्व केले होते. त्यांनी भारतात स्टील इंडस्ट्रीच्या विकासात आपले अत्याधिक योगदान दिले.’

१९६३ मध्ये UK मधून मेटलर्जीत PhD

२ जून १९३६ रोजी नागपुरात जीजी इराणी आणि खोरदेश इराणींच्या घरात जन्मलेल्या जमशेद इराणींनी १९५६ मध्ये नागपुरातील सायन्स कॉलेजमधून BSc आणि १९५८ मध्ये नागपूर विद्यापीठातून प्राणीशास्त्रात MSc केली होती. यानंतर ते जे एन टाटा स्कॉलर म्हणून ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी १९६० मध्ये मेटलर्जीत मास्टर्स केले. नंतर १९६३ मध्ये त्यांनी मेटलर्जीतच PhD मिळवली.

१९६८ मध्ये टाटा स्टीलमध्ये जॉईन

जमशेद इराणींनी १९६३ मध्ये शेफिल्डमध्ये ब्रिटिश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनसह आपल्या व्यावसायिक करिअरला सुरुवात केली होती, मात्र ते नेहमी आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा विचार करत होते. १९६८ मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत काम करण्यासाठी ते भारतात परतले. तेव्हा त्यांनी कंपनीत डायरेक्टर इन्चार्ज ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेन्टच्या असिस्टन्ट पदावर जॉईन केले होते.

१९८५ मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले

असिस्टन्न पदावर काम केल्यानंतर जमशेद इराणी १९७८ मध्ये जनरल सुपरिटेन्डेन्ट, १९७९ मध्ये जनरल मॅनेजर आणि १९८५ मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले. यानंतर पुन्हा ते १९९८ मध्ये टाटा स्टीलचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्टर आणि निवृत्त होण्यापूर्वी१९९२ मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर बनले होते.

टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे संचालक राहिले

जमशेद इराणी १९८१ मध्ये टाटा स्टीलच्या मंडळात सहभागी झाले आणि २००१ पासून एक दशकापर्यंत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरही राहिले. टाटा स्टील आणि टाटा सन्सशिवाय डॉ. इराणींनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससह टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी १९९२ ते १९९३ पर्यंत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सांभाळले होते.

२००७ मध्ये पद्मभूषणने गौरव

जमशेद इराणींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यात १९९६ मध्ये रॉयल अकादमी ऑफ इंजिनिअरिंगचे इंटरनॅशनल फेलो म्हणून त्यांची नियुक्ती आणि १९९७ मध्ये महाराणी एलिझाबेथकडून भारत-ब्रिटिश व्यापार आणि सहकार्यात त्यांच्या योगदानासाठी मानद नाईटहूडचाही समावेश आहे.
इंडस्ट्रीमध्ये डॉ. इराणींच्या योगदानासाठी त्यांना २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना मेटलर्जीतील सेवांसाठी २००८ मध्ये भारत सरकारकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. इराणींच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी डेजी इराणी आणि त्यांची तीन मुले जुबीन, निलोफर आणि तनाज आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!