Just another WordPress site

पुण्यात Burning बसचा थरार; ४२ प्रवासी असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या शिवशाही बसला

पुण्यात राज्य परिवहन विभागाच्या शिवशाही बसला आज अचानक आग लागली. बसचालकाच्या वेळीच हे लक्षात आल्याने त्याने बस तातडीने रस्त्याच्या बाजुला उभी करत बसमधील सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले. त्यामुळे बसमधील सर्व ४२ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. बसचालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे काही दिवसांपुर्वीच नाशिक येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.

प्रथम बसमधून धूर

राज्य परिवहन विभागाची शिवशाही बस सोमवारी रात्री यवतमाळ येथून पुण्याच्या दिशेने येण्यास निघालेली होती. यवतमाळ- औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ती येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात गलांडे हाॅस्पिटल जवळ आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हाच अचानक बसमधून धुर येऊ लागला. त्यामुळे शिवाजीनगर बस स्थानकाकडे निघालेल्या या बसला चालकाने रस्त्याच्या बाजूला नेत थांबवले.

बस जळून खाक

रस्त्याच्या बाजुला बस थांबवत चालकाने सर्व प्रवाशांना गाडीच्या खाली उतरण्यास सांगितले. याचदरम्यान अचानक बसने पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनीही तात्काळ बसकडे धाव घेत अग्निशामक दलाच्या गाडीस घटनास्थळी बोलावले.अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पेटलेल्या शिवशाही बसवर पाण्याचा वेगाने फवारा मारत आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.

इंजिन गरम होत होते

अग्निशामक दलाच्या जवानांनी कुलिंगचे काम करत बस मधील पूर्ण आग विझल्याची खातरजमा केली. मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथून निघाल्यापासून बसचे इंजिन सातत्याने गरम होत होते. त्यामुळे बस सावकाश पुण्याच्या दिशेने आणण्यात येत होती. परंतु पुण्यातील येरवडामध्ये आल्यावर बसने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!