Just another WordPress site

संगीताचा बादशाह असलेले ए. आर. रहमान हलाखीच्या दिवसात वाद्ये भाड्याने देऊन गुजराण करायचे

फक्त बॉलिवूडच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय असलेले गायक आणि संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर इतर भाषांमध्ये गाणी गात चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंय. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. दरम्यान, संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या रहमान यांचा आज ५६ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी.

ए. आर रहमान यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. इतकंच नाही तर रहमान यांनी भारतीय सिनेविश्वात संगीताला एक वेगळा आयाम दिलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवरही रहमान यांच्या कामाचा गौरव झाला. रहमान यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ साली चेन्नईमध्ये झाला. ते मूळचे हिंदू असूनही त्यांचं नाव ए. एस. दिलीपकुमार असं होतं. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून संगीत साधनेला सुरुवात केली होती. रहमान यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. मात्र, रहमान हे नऊ वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या जाण्यामुळे रहमान यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. घराची संपूर्ण घडी विस्कटून गेली होती. त्यामुळं घर चालवण्यासाठी रहमान हे आपल्या वडिलांचे वाद्ये भाड्याने देऊ लागले. आणि आपला उदरनिर्वाह करु लागेल. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. त्यानंतर रहमान यांनी मास्टर धनराज यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकले.

रहमान हे उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यातला संगीतकार घडला. यातच करिअर करायचे त्यांनी ठरवले. त्यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यांनी Western classical music मध्ये डिप्लोमा केला. संगीत क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९२ साली रहमान यांच्या करिअरला खरी सुरुवात झाली. सुरवातीच्या काळात त्यांनी अनेक जाहिरातींना जिंगल संगीत दिले होते. ते दिग्दर्शक मणीरत्नम यांनी ऐकले आणि त्यानंतर ‘रोजा’ या चित्रपटास संगीत देण्याचा मणीरत्नम यांनी रहमान यांना आग्रह केला. सुरुवातीच्या त्यांनी मणीरत्नम यांना नकार दिला. मात्र, आईच्या आग्रहास्तव रहमान यांनी ‘रोजा’ या चित्रपटाला संगीत दिले. पदार्पणातच टवटवीत संगीत देऊन त्यांनी प्रतिभेचा आविष्कार घडवला. या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली होती. या पहिल्याच चित्रपटासाठी रहमान यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळं रहमान यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. नंतरच्या काळात त्यांनी ‘दिल से’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘जय हो”बॉम्बे’, ‘रंगीला’, ‘दिल से’, ‘ताल’, ‘जींस’, ‘पुकार’, ‘फिजा’, ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा-अकबर’, ‘युवराज’, ‘स्लमडॉग मिलेनियर’ ‘रॉकस्टार’ आणि ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटांना संगीत दिलं.

रहमान यांनी त्यांच्या संगीताने प्रत्येकाच्या मनात घर केलंय. एका गाण्यासाठी सर्वात जास्त मानधन आकारणाऱ्या गायक-संगीतकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. एका गाण्यासाठी काही कोटी आकारणारे ए आर रहमान लाईव्ह कॉन्सर्टच्या वेळीही एका तासासाठी आकारत असलेल्या मानधनाचा आकडा कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टनुसार ए आर रहमान हे २ हजार ५० कोटी संपत्तीचे मालक आहेत. ते एका चित्रपटात गाणी संगीतबद्ध करण्यासाठी आणि गाण्यासाठी १० कोटी रुपये आकारतात. त्याचप्रमाणे एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी ते तासाला ३ ते ५ कोटी आकारतात.

ए. आर. रहमान यांच्या संगीत क्षेत्रातील कर्तृत्वाची दखल घेऊन सरकाराने यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. ‘स्लम डॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी त्यांना गोल्डन ग्लोब, ऑस्कर आणि ग्रॅमी यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!