Just another WordPress site

५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांत सिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलं होतं २१ रुपये मानधन, काय आहे किस्सा?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा आज जन्मदिवस. आज तो या जगात नसला तरीही चाहत्यांच्या मनात त्याने एक खास जागा निर्माण केलीये. कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना सुशांत सिंहने स्वतःच्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. यशाच्या शिखरावर असताना त्याच्या आकस्मिक मृत्यूने देशाला धक्का बसला होता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान, यशस्वी अभिनेता म्हणून स्वत:ला सिध्द केल्यानंतर सुशांत सिंहने एका सिनेमासाठी फक्त २१ रुपये मानधन घेतलं होतं.

सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. बिहारमध्ये जन्मलेल्या आणि दिल्लीत वाढलेल्या या मुलाने रुपेरी पडद्यावर येण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केलं होतं. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या स्वभावानेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. सुशांत सिंह हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता. अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेत अव्वल झाल्यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता. पण, इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर त्याची भेट प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक डावर यांच्याशी झाली होती. त्यावेळी सुशांतने त्यांच्यासोबत डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. डावर यांच्या साथीने सुशांतने नृत्यात हात आजमावला आणि २००६मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला ऐश्वर्या रायसोबत डान्स करण्याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने मुंबईत येऊन नादिरा बब्बरसोबत थिएटर केले. याच दरम्यान एकता कपूरची नजर त्याच्यावर पडली. एकताने त्याला त्याला ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य अभिनेता साकारण्याची संधी दिली. या मालिकेमुळे सुशांतला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सुशांतसाठी बॉलीवुडची दारं खुली झाली होती. ‘काई पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवडूमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केलं होतं. ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी’ आणि ‘एम.एस.धोनी’, ‘छिछोरे’ या चित्रपटांनी सुशांत सिंहला अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. पण यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतने १४ जून २०२० रोजी गळफास घेतला आणि जीवन संपवलं होतं.

‘पवित्र रिशता’ ते बॉलीवुड असा सुशांत सिंह राजपूतचा प्रवास थक्क करणारा होता. इतकं नाव कमावणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्याने या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.सुशांतने बघताबघता बॉलीवुडमध्ये स्वतःची वेगळी ओळख बनवली होती. त्यामुळं सुशांतने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्याच्यातील प्रेम, माणुसकी कधीही कमी झाली नाही. पण काळाने त्याच्यावर घाला घातला. मात्र, आजही त्यांच्या स्मृती प्रेक्षकांच्या मनात जीवंत आहे. कारण सुशांत माणूस म्हणूनही तितकाच उमदा होता. ज्यावेळी तो कोट्यवधी मानधन आकरत होता. अशावेळी त्याने काही चित्रपट विना मानधनही केलेत.

बॉलीवुडमध्ये सुशांतची बरीच हवा होती. त्यावेळी दिग्दर्शक राजकुमार हिरानी पिके चित्रपट करत होते. आमीर खान यांची प्रमुख आणि अनुष्का शर्माची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटात सुशांतला केवळ १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी विचारले गेले. त्यावेळी चित्रपटाचा विषय ऐकून आणि हिरानी यांच्यासोबत काम करण्याची संधी पाहून सुशांतने कोणतंही मानधन देणार नसाल तर काम करीन अशी अट घातली. सुशांत सिंह त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये मानधन घ्यायचा. पण या चित्रपटातील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याने राजकुमार हिराणीकडून एकही रुपया घेतला नाही. भूमिका लहान पण महत्त्वाची होती, त्यामुळे सुशांतने मानधन घेण्यास नकार दिला होता. पण, अवघ्या पंधरा मिनिटांच्या भूमिकेतही सुशांतने प्रेक्षकांना भुरळ घातली. शेवटी राजकुमार हिरानी यांनी सुशांतच्या हातावर २१ रुपये शुभशकुन म्हणून ठेवले, आणि सुशांतने तेवढीच रक्कम आशीर्वाद म्हणून आनंदानं स्वीकारली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!