Just another WordPress site

महिला आयोगाने पाठवली चित्रा वाघ यांना नोटीस, उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद सुरू आहे. उर्फी जावेदचा नंगा नाच महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. यामुळे या वादाला सुरूवात झाली होती. काल पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकरांवर जोरदार आरोप केले होते.

या संबंधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा (Chitra Wagh) वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवत असल्याचे सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “चित्रा वाघ यांनी काल अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. मात्र ही नोटीस अनुराधा मालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आली होती. याबद्दल त्यांनी खुलासेही केले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाबद्दल अविश्वास निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.”

“त्यामुळेच आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोग चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आहे, यावर दोन दिवसांत खुलासा करावा दोन दिवसांत खुलासा केला नाही तर कोणतेही म्हणणे नाही म्हणून महिला आयोग एकतर्फी कारवाई करेल,” असा ईशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

त्याचबरोबर चित्रा वाघ संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या, रघुनाथ कुचिक प्रकरणात तोंडावर पडल्या. पोलिसांना भेटायला गेल्या मात्र पोलिसांनीही त्यांच्या बालिशपणाची दखल घेतली नाही. गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असूनही दखल घेतली जात नाही, हा त्यांचा बालीशपणा आहे, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली आहे. भाकरीच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रश्न विचारतोय आणि तुम्ही कपड्यांवर बोलत आहात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!