Just another WordPress site

जळगाव जामोदमध्ये कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा निर्घृणपणे खून, परिसरात खळबळ

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यात ही घटना घडली. यात माऊली भोटा येथील रहिवासी असलेले बुधाजी वानखडे हे गावाजवळ असलेल्या शेतामध्ये पत्नीसोबत एका झोपडीत राहात होते. चार दिवसांपासून बुधाजी वानखडे यांचे पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन वाद सुरूच होते. याच कारणावरुन बुधाजी यांनी अतिशय धक्कादायक पाऊल उचललं.

शोभाबाई वानखडे यांचे पती बुधाजी वानखडे यांनी रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या शोभाबाईंच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत त्यांचा खून केला. यानंतर स्वतःही झोपडीत लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. बुधाजी वानखडे यांचा मुलगा सदानंद वानखडे हा गव्हाला पाणी देण्याकरता आला असता त्याने आई आणि वडिलांना आवाज दिला. मात्र झोपडीतून काही प्रतिसाद आला नाही.

त्यानंतर सदानंद वानखडे याने दरवाजा उघडला असता त्यांना शोभाबाई रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या दिसल्या. समोरच वडीलही गळफास घेऊन लटकलेले दिसले. त्यावरून घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. यानंतर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. मात्र पती आणि पत्नीच्या मृत्यूच्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!