Just another WordPress site

“अर्धवट सोडलं शूटिंग, पैसेही परत केले नाही”; सनी देओलवर दिग्दर्शकाकडून गंभीर आरोप

सध्या मनोरंजन विश्वापासून दूर असला, तरी अभिनेता सनी देओल काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सनी देओल आता त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे प्रसिद्धी झोतात आला. बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओलवर पैसे लाटल्याचा आरोप केला. खरंतर कधी काळी सुनील दर्शन आणि अभिनेता सनी देओल ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी ठरली होती. दोघांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले होते. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्यांच्यात वाद आहे.

‘गदर’, ‘घायल’, ‘घातक’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूड अभिनेता सनी देओलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘ढाई किलो का हाथ’ हा त्याचा गदर चित्रपटातील डायलॉग प्रसिद्ध आहे. मात्र, बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सुनील दर्शन यांनी त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यामुळं सध्या सनी देओल चर्चेत आहे. खरंतर सुनील दर्शन यांनी ‘इंतकाम’, ‘लुटेरे’ आणि ‘अजय’ या सारखे चित्रपट तयार केले, ज्यात सनी देओल मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र, ‘अजय’ प्रदर्शित झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु झाले होते, जे आजतागायात सुरू आहेत. नुकतीच सुनील दर्शन यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सनी देओलवर गंभीर आरोप करून आपली फसवणूक केल्याचं सांगितलं.
१९९६ मध्ये सुनील दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला अजय हा चित्रपट प्रदर्शित झाला. सनीने मधातच चित्रपटातून काढता पाय घेतला आणि क्लायमॅक्स शूट करण्यास नकार दिला, असा आरोप सुनील यांनी केला. चित्रपट अर्ध्यावरच सोडून, त्याने पैसे देखील परत करण्यास नकार दिला. त्यामुळं क्लायमॅक्सशिवायच चित्रपट प्रदर्शित केल्याचं त्यांनी सांगितलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ठीकठाक प्रतिसाद मिळाला, मात्र त्यानंतर सुरुवातीला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या या जोडीत पैशावरून वाद झाले. आणि त्यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली.
या वादावर बोलतांना सुनील दर्शन म्हणाले, “सनी देओल प्रचंड गर्विष्ठ आहे. त्याने माझी फसवणूक केली आहे. सनी देओलने माझ्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे तो मला परत करणार होता. मी पैसे मागितल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असं तो म्हणाला. त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर चित्रपट बनवा. मी त्यात काम करेन, असंही तो म्हणाला होता. निवृत्त न्यायाधीश यांच्या समोर त्याने हे कबूल केलं होतं. पण त्याने मला फसवलं”.
पुढे त्यांनी सांगितल की, “सनी देओलने अजय चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच सोडलं. नंतर शूटिंगवेळी तो काही ना काही कारण द्यायचा. कोर्टाकडून त्याला नोटीस पाठवल्यानंतर चित्रपटातील डायलॉग आवडला नसल्याचं कारण त्याने दिलं होतं. चित्रपटातील डायलॉग मी त्याच्याकडून मान्य करुन का घेऊ? त्याच्यामुळे चित्रपटासाठी लावलेले खूप पैसे आणि वेळही वाया गेला. शेवटी चित्रपटाचं शूटिंग अर्धवटच राहिलं आणि चित्रपट तसाच प्रदर्शित करावा लागला. आज २६ वर्षांनंतरही त्याने माझे पैसे परत केलेले नाहीत”.
दरम्यान, सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!