Just another WordPress site

नागपुरातील मिरची मार्केटमध्ये भीषण आग, कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक

नागपूर : नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली. नागपुरातील कळमना मिरची मार्केटमध्ये मोठी आग लागली. आगीच्या या दुर्घटनेत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं. या भीषण आगीचा व्हिडिओही समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमधील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. या बाजार समितीत मध्यरात्री अचानक आग लागली. आग भीषण असल्यामुळं काही वेळातच या दुर्घटनेत एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र, नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली होती. यात शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाली. सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळं या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला. बाजार समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणं कालच आग लागलेल्या शेडमध्ये इलेक्ट्रिसिटीचे काम झाले होते. ते काम अर्धवट असल्यामुळं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळं आग लागली असावी, असं सांगितलं. दरम्यान, आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार ते पाच हजार पोती लाल मिरची जळून खाक झाल्याची माहिती संचालक मंडळाच्या सदस्यांनी दिली. यात जवळपास १५ ते १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, बाजार समितीच्या चुकीच्या ढिसाळपणामुळंही आग लागली असून त्याचा फटका हा शेतकऱ्यांसह व्यापऱ्यांना बसल्यानं नुकसान भरपाई देण्याची मागणी होतेय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!