Just another WordPress site

राज्यपाल कोश्यारी नेहमी वादग्रस्त राज्यापाल म्हणून चर्चेत, राज्यपाल कोश्यारींचा वादाचा इतिहास काय?

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी अनेकवेळा चर्चेत आले. मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण सिद्ध करणारे कोश्यारी नेहमी वादग्रस्त राज्यापाल म्हणून चर्चेत राहिले. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर अनेकवेळा कोश्यारींची जीभ घसरली. नुकतचं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे’, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. यामुळे नवीन वाद निर्माण झाला. मात्र, राज्यपालांनी असं विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काही वादग्रस्त विधानं त्यांनी केलीत.

 

महत्वाच्या बाबी

१. राज्यपाल कोश्यारी नेहमी वादग्रस्त राज्यापाल म्हणून चर्चेत
२. कधी महापुरुषांवर टीका तर कधी मराठी माणसाला डिवचलं
३. छ. शिवाजी महाराज, फुले दाम्पत्यांविषयी केली संतापजनक वक्तव्ये
४. ‘नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत’ – राज्यपाल

 

“शिवाजी जुन्या काळातले आदर्श”

मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानद डि. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुलना थेट नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशीच केली. यावेळी ते म्हणाले, आज तुम्हाला आदर्श शोधायचे असतील तर कोठे बाहेर जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकतात. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण आहेत तर मला वाटते तुम्हाला ते इथेच मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलंय.

 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?

समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले होते की, ‘चाण्याक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपलं विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होतं. आता त्यासंबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचं आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी सारवासारव केली होती.

 

तर मुंबईत पैसा उरणार नाही..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ जुलै मुंबईतील एका कार्यक्रमात गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. “राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे. हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव आणि दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही,” असं राज्यपाल म्हणाले होते.

 

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान

भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले, “सावित्री बाईंचं लग्न १० व्या वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील?”असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

 

नेहरूंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेमुळे भारत कमकुवत

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला,” असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!