Just another WordPress site

‘सनी’ सिनेमाच्या प्रेक्षकांसोबत धक्कादायक प्रकार, हेमंत ढोमे पोस्ट करत म्हणाला, ‘महाराष्ट्रातच मराठी सिनेमाला दुय्यम वागणूक?’

अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’हा सिनेमा १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रीरिलिज शोंना पुणे आणि ठाण्यात प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. सिनेमा हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोशल मीडियावरही सिनेमाच्या टीमकडून याबाबत आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यात आल्या. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाच्या प्रेक्षकांसोबत घडत असलेला प्रकार धक्कादायक आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने स्वत: सोशल मीडियावर लागोपाठ पोस्ट करत संताप व्यक्त केला.

हेमंत ढोमे सध्या त्याच्या ‘सनी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा हेमंत अनेकदा त्याच्या चित्रपटांसंबंधी अपडेट चाहत्यांशी शेअर करत असतो. याशिवाय तो अनेकदा मराठी चित्रपटांच्या सद्य परिस्थितीकडेही सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. मराठी चित्रपट आणि बॉक्स ऑफिसबद्दल हेमंत ढोमेनं केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे. हेमंतचा ‘सनी’ हा मराठी चित्रपट सध्या बराच गाजतोय. घरापासून दूर असलेल्या एका तरुणाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण असं असताना ही काही प्रेक्षकांना मात्र तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात आल्याचं सांगितलं. यासंबंधी ट्वीट करून हेमंत ढोमेने मराठी चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीकडे सर्वांचं लक्ष वेधलं.
हेमंतने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात विविध ठिकाणी या सिनेमाचे शो अचानक रद्द केले जात आहे. परिणामी सिनेमा थिएटरमध्ये कधी लागणार आहे हे पाहून वेळेत पोहोचलेल्या प्रेक्षकांचा खोळंबा होत आहे. तर काही प्रेक्षकांसोबत तर आणखी अजब प्रकार घडतो आहे. या प्रेक्षकांनी तिकिट बुक करूनही शो रद्द झाल्याने त्यांना सिनेमा पाहता येत नाही आहे. काहींनी त्यांच्या मोबाइलवर मेसेज करून कळवले जात आहे की ‘सनी’चा शो रद्द करण्यात येत आहे. महाराष्ट्रातच मराठी सिनेमाला अशी दुय्यम वागणूक मिळत असल्याने हेमंतने संताप व्यक्त केला.

मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंत ढोमेने खरमरीत ट्वीट केलं. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “आपल्या अजून एका प्रेक्षकाबरोबरही तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 कल्याणमधला हा प्रकार… प्रेक्षक जात असूनही चित्रपट असा डावलला जाणं चूक की बरोबर?” तसेच आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्याने, “दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?” असंही म्हटलं आहे.

हेमंत ढोमेच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. आपल्या कमेंट्समधून युजर्सनी हेमंतच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मराठी चित्रपटांना प्रेक्षक असतानाही केवळ हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन देत मराठी चित्रपटसृष्टीवर अन्याय केला जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अर्थात या आधीही एक प्रेक्षकाबरोबर असा प्रकार घडला होता आणि त्याकडेही हेमंत ढोमेने लक्ष वेधलं होतं.

दरम्यान सनी सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असून चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेके देशमुख, अमेय बर्वे, पार्थ केतकर अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अक्षय बर्दापूरकर आणि क्षिती यांची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचे बरेसचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. असे असताना सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने प्रेक्षकही नाराजी व्यक्त करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!