Just another WordPress site

जगदंबा तलवार परत आणण्याची सरकारची घोषणा; पण, तुम्हाला ठाऊक आहे का? शिवरायांकडे जगदंबा तलवारी शिवाय ‘ह्या’ दोन तलवारी होत्या

मुंबईः छत्रपती शिवरायांची प्रत्येक आठवण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहास सांगणारी आणखीन एक वस्तू आहे जी सध्या ब्रिटनमध्ये आहे. अर्थात महाराजांची ‘जगदंबा तलवार’. दरम्यान, आता शिवप्रताप दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०२४ पर्यंत जगदंबा तलवार राज्यात आणली जाईल अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींकडे नेमक्या किती तलवारी होत्या, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती तलवारी होत्या याबाबत कागदोपत्री नोंदी सापडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण तीन तलवारी होत्या. त्या तलवारी आता कुठे आहेत, याचा घेतलेला शोध.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एकूण तीन तलवारी होत्या. तुळजा, भवानी आणि जगदंबा… या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील होत्या. मात्र, आता या तलवारी कुठे आहेत या प्रश्न अनेकांना सतावत होत्या शिवरायांच्या वापरातील या तीन तलवारींपैकी एक तलवार ही ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात असल्याचं अलीकडेच उघड झालं होतं. पण, इतर दोन तलवारी या भारतातच असून आपल्या महाराष्ट्रातच असल्याचंही सापडलेल्या नोंदीतून स्पष्ट होतंय.

 

जगदंबा तलवार

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगदंबा तलवार सध्या ब्रिटनमधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे. लंडनच्या रॉयल कलेक्शनमध्ये असणारी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिचे पूर्वापार चालत असलेले नाव जगदंबा असल्याचंही स्पष्ट झालं आहे. शिवरायांची तलवार भारतात परत आणण्यासाठी आत्तापर्यंत अनेकदा प्रयत्न करण्यात आले.

 

तुळजा तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. ही तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या श्री शिवराजेश्वर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरच एका काचेच्या पेटीत ही तलवार ठेवण्यात आली आहे. तुळजा तलवार शहाजी राजे यांनी १६६२ साली शिवाजी महाराजांना दिली होती.

 

भवानी तलवार

महाराजांच्या वापरात असलेली भवानी तलवार ही महाराष्ट्रातच असून साताऱ्याच्या छत्रपतींच्या खासगी संग्रही आहे. याची नोंद अनेक इतिहासात देखील आहे. सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर महालामध्ये भवानी तलवार आहे. त्यावर ‘सरकार राजा शाहू’ असे कोरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!