Just another WordPress site

“ऑफिसला येत असाल तर घरी परत जा”; ट्विटरचा मेल; मस्क हे ट्विटरच्या ५० टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत!

ट्विटरची सूत्र एलॉन मस्क यांच्याकडे आल्यानंतर एकामागे एक धक्के मिळायला सुरुवात झाली. आधी ब्लू टिकसाठी पैसे आकारले. नंतर कर्मचाऱ्यांच्या कपातीचे संकेत दिले. कर्मचाऱ्यांना १२ तास काम करण्याच्या सूचना दिल्या आणि आता चक्क कर्मचाऱ्यांना मेल करून त्यांना कामावरून कमी केलं.

 

महत्वाच्या बाबी

१. “ऑफिसला येत असाल तर घरी परत जा”
२. ट्विटर कडून आपल्या कर्मचाऱ्यांना मेल
३. ट्विटरच्या ५० टक्के कर्मचार्‍यांना मस्क काढणार
४. कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता अन् खळबळ

 

ट्विटर आणि मस्कचा व्यवहार पूर्ण होणार की नाही याबाबत प्रचंड गोंधळ आणि शंका होत्या. आता हा करार पूर्ण होत ट्विटरचा ताबा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्याकडं आला. त्यानंतर ट्विटरचे नवे मस्क यांनी अजब निर्णय घेतले. मस्क यांनी आल्या आल्याच ट्विटरच्या बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. मस्क यांनी ट्विटरची कमान स्वीकारल्यापासून एक आठवड्यात अनेक घडामोडी घडल्या. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्या गच्छंतीनंतर मस्क यांनी आता संपूर्ण संचालक मंडळालाच डच्चू दिला असून ते स्वतःच एकमेव संचालक बनले. त्यानंतर मस्क यांनी आठवड्याचे सातही दिवस १२-१२ तास काम करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले. नाहीतर त्यांची नोकरी जाईल, असे तुघलकी फर्मान मस्क यांनी काढले. ४४ अब्ज डॉलरला पडलेला हा सौदा मस्क यांना फायद्यात आणायचा आहे. हा पैसा लवकरात लवकर वसूल करण्यासाठी मस्क यांनी ब्ल्यू टीकचे सबस्क्रीप्शन आणले. त्यासाठी महिन्याला आठ डॉलर मोजावे लागणार आहेत. खरंतर अब्जाधीश बॉस आल्यानंतर आपले दिवस पालटतील असं ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना वाटलं होतं. पण मस्क यांनी सूत्रे हाती घेताच नशीब पालटण्याऐवजी त्यांचं नशीबच फिरलं आहे. ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण आणि दुःखद आहे. मस्क यांनी कंपनीतून कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचं निश्चित केलं. आता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ईमेल्सही पाठवले जात आहेत. एवढंच नव्हे तर ऑफिसला येत असाल तर घरी परत जा आणि मेलची वाट पाहा, असंही कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितलं.

कर्मचाऱ्यांना ट्विटरकडून एक मेल आला. त्यात लिहिलंय की, “Twitter चांगल्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आम्ही काही कठीण निर्णय घेत आहोत. आम्ही शुक्रवारी जागतिक पातळीवर कर्मचारी कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाऊ. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम अनेक व्‍यक्‍तींवर होईल ज्यांनी Twitter वर अमूल्य योगदान दिलंय, मात्र, कंपनीच्या यशासाठी ही कृती दुर्दैवाने आवश्‍यक आहे. आमच्या कर्मचार्‍यांचे स्वरूप आणि प्रभावित व्यक्तींना शक्य तितक्या लवकर माहिती देण्याची आमची इच्छा लक्षात घेता, ही प्रक्रिया मेलद्वारे पार पडेल. शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पर्यंत, प्रत्येकाला वैयक्तिक ईमेल मिळेल”, असं या मेलमध्ये लिहिल. याच मेलमध्ये पुढं लिहिलंय की, ” जर ट्विटर कर्मचाऱ्याची नोकरी सुरक्षित असेल तर त्याला कंपनीच्या ईमेलद्वारे कळवले जाईल. त्याच वेळी, ज्या लोकांना नोकरीवरून काढण्यात आलंय, त्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेलवरून तसे सांगितले जाईल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसला जात असाल तर कृपया घरी परत जा”, असं या मेलमध्ये सांगण्यात आलंय.

हा मेल समोर आल्यानंतर कंपनी आपल्या खर्चात कपात केल्याबद्दल निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले जातंय. हा मेल मिळाल्यापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता, खळबळ आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे.
मस्कच्या या निर्णयाचा परिणाम केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात दिसून येईल. या निर्णयानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!