Just another WordPress site

इसुदान गढवी आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, केजरीवालांची घोषणा; गढवी हे गुजरातमध्ये भाजपच्या सत्तेला हादरा देतील का?

आम आदमी पार्टीने आज गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला. गुजरातमध्ये मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून इसुदान गढवी यांचं नाव आपने घोषित केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. दरम्यान, इसुदान गढवी आहेत तरी कोण? ते आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये सत्ता मिळवून देतील का? याच विषयी जाणून घेऊ.

महत्वाच्या बाबी

१. आम आदमी पार्टीने जाहीर केला सीएमचा उमेदवार
२. इसुदान गढवी आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
३. गुजरातमध्ये तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख
४. इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकारही आहेत

गुजरातमध्ये १९५५ पासून भाजपची सत्ता आहे. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने ही निवडणूक रंजक बनली. कारण भारतीय जनता पक्षाला १९५५ पासून भाजपला गुजरातमधील विजय अखंडित ठेवायचा आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये तळ ठोकलाय. त्यांनी गुजरातमध्ये आपली संपूर्ण ताकद लावलीय. मोफत वीज, व्यापाऱ्यांना सवलती, शिक्षण, आरोग्य या मुद्द्यावर दिल्लीप्रमाणेच सत्ता आल्यास गुजरातमध्ये भर देऊ असे सांगितले. आपने आपली एक लोकाभिमुख प्रतिमा निर्माण केली. याचा मोठा फटका भाजला बसू शकतो. दुसरं म्हणजे, आम आदमी पक्ष हिंदुत्वाची भाषा बोलतांना प्रचार काळात दिसला. प्रचाराच्या काळात केजरीवाल यांनी हनुमान मंदिराला भेट दिली आणि हनुमान चालिसाचे पठण केले. आम आदमी पक्षानेही भाजपप्रमाणे लोकांच्या हिंदू अस्मितेला साद घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भाजप हा काँग्रेसपेक्षाही मोठं चॅलेंज म्हणून आम आदमी पक्षाकडे बघतो.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला. पंतप्रधान मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने इसुदान गढवी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं जाहीर केलंय. याबाबत लोकांकडून मते मागवली होती. त्यानंतरच लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारे सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराचे नाव आपकडून जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आप नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोराठिया यांचा समावेश आहे. अखेर इसुदान गढवी यांच्या नावावर सीएम पदाचा उमेवार म्हणून शिक्कामोर्तब झालं. इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा करतांना केजरीवाल यांनी सांगितलं की, गुजरातमधील १६ लाख ४८ हजार ६०० लोकांनी आपले मत त्यांना दिले. गुजरातमधील १६ लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधारे त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा इसुदान गढवी हेच असतील, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील जामखंभाळीया तालुक्याजवळच्या पिपलिया गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात १० जानेवारी १९८२ रोजी इसुदान गढवी यांचा जन्म झाला. इसुदान गढवी हे व्यवसायाने पत्रकारही आहेत. एका प्रादेशिक भाषेतील टीव्ही वृत्तवाहिनीवर प्राइम टाइममध्ये ‘महामंथन’ या डिबेट शोसाठी त्यांना ओळखलं जातं. या कार्यक्रमात लोकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून गढवी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली. तिथून मग पत्रकार ते ‘आप’चे राष्ट्रीय नेते बनलेल्या इसुदान गढवी यांच्या प्रवासाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जामनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर गढवी यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना त्यांची विद्यापीठ सेक्रेटरी म्हणूनही निवड करण्यात आली होती. पत्रकार बनल्यानंतर २०१४ मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पत्रकारिता सोडून गावी जाण्याचा त्यांच्या मनात विचार सुरू होता. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की कितीही अडचणी आल्या तरी पत्रकारिता सोडू नकोस. याच प्रेरणेतून त्यांनी आपली पत्रकारिता चालू ठेवली. सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये त्यांनी ई टिव्हीसाठी वार्तांकन केलं. नंतर अहमदाबादमध्ये न्यूज-18 चॅनेलचे ब्युरो चीफ बनले. २०१६ मध्ये व्ही टीव्हीसारख्या आघाडीच्या चॅनेलमध्ये संपादक पदही त्यांनी भूषवले.

इसुदान गढवी यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत १४ जून २०२१ रोजी पक्षात प्रवेश केला. गुजरातमधील ‘आप’चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.इसुदान गढवी हे सध्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणूकीत अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी दिली होती. त्यात ते यशस्वी ठरले होते. पंजाबनंतर त्यांनी गुजरातमध्येही लागू केलेला हा पॅटर्न यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!