Just another WordPress site

हातची सत्ता गेल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी फालतूगिरी; शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीवर निशाना

राज्यात सध्या ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असं चित्रं उभं राहिलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला असून, निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, नाशिक, ठाणे अशा अनेक ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत. दुसरीकडे मनसे मात्र चित्रपटाच्या बाजूने उभी असून बंद पडलेले शो पुन्हा सुरु करण्यास लावत आहे. दरम्यान, या वादात आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीही उडी घेतली आहे.

शरद पोंक्षे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला संमती दिली असताना त्याला विरोध का केला जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली आहे. संभाजीराजेंची आपण भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. शासनाने तिथे हुशार माणसं नेमली आहेत. कोणता प्रसंग इतिहासातील कोणत्या प्रसंगावर आधारित आहे याचे पुरावेही त्यांना आपल्या दिग्दर्शकाने दिले आहेत. पण सिनेमा रिलीज झाल्यानतंर दोन आठवड्यांनी अचानक यांना सुचलं का?,” असा संताप शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला आहे.

प्रेक्षकांना मारुन चित्रपटगृहातून बाहेर काढलं जात असल्यासंबंधी विचारल्यानंतर ते म्हणाले, हा तर हलकटपणा आहे. म्हणजे सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला सिनेमा चालू असताना तुम्ही प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढता. या विरोध करणाऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं ते सिनेमा बनवणाऱ्याला नाही का? तुम्ही काय गुंड आहात? आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवलं का?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!