Just another WordPress site

निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, उत्पादन लांबणार, द्राक्ष बागायतदारांना बसणार फटका

नाशिक : द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव मोठे केले. भारतीय द्राक्ष उत्पादक आता जगात सातव्या क्रमांकावर असून आहे. देशातील क्रमांक एकचे द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदार राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील द्राक्ष शेती अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर झुलतेय. यंदा पाऊस उशीरा आल्यानं द्राक्ष निर्यात लांबणार आहे. परिणामी, निर्यात धोरण बदलल्याने त्याचाही मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.

यंदा अतिमुसळधार पावसामुळं द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळालं. कारण, परतीच्या पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा सर्वात जास्त फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. नाशिक, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत मिळून राज्यात सुमारे ३ लाख एकर पेक्षा अधिक द्राक्ष बागा आहेत. नाशिक जिल्ह्याचे दीड ते पावणेदोन लाख एकरांपर्यंतचे क्षेत्र हे द्राक्ष बागेचं आहे. मात्र, अवकाळी पावसाचा फटका द्राक्षबागांना बसल्यानं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, आता नाशिक जिल्ह्यात यंदा द्राक्षाची गोडी उशिरा चाखता येणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या वर्षी सातत्याने पडलेला मुसळधार पाऊस. नाशिकमधून परदेशात पाठविण्यासाठी नाशिकचा द्राक्ष हा गुणवत्तापूर्ण द्राक्ष असल्याने मोठी मागणी असते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. अजूनही बऱ्याच शेतातून पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. दरवर्षी सप्टेंबर अखेर पर्यन्त पाऊस हा थांबत असतो, त्यानंतर द्राक्ष बागेच्या छाटणीला सुरुवात होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसही उशिरा दाखल झाल्याने पाऊसही उशिरा उघडला. त्याच द्राक्ष बागेच्या फळधारणेसह उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे फार मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला. याच कालावधीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत, शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. त्याचबरोबर गत वर्षी पीक छाटणीवेळी अवकाळी पाऊस सुरूच असल्याने, द्राक्ष पिक व्यवस्थित आलेले नाही. तर यंदा द्राक्षाची होणारी निर्यात लांबणार आहे. शिवाय, निर्यात धोरण बदलल्याने त्याचाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

साधारणपणे द्राक्षाची परिस्थिती पहिली तर सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस थांबतो आणि ऑक्टोबर महिन्यातंय द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरवात होत असते. यंदाच्या वर्षी हे गणित महिन्याने लांबणीवर पडले. ऐन थंडीत द्राक्षाची छाटणी यंदा होणार असून द्राक्ष मण्यांच्या फुगणीवर याचा परिणाम होणार आहे. यंदाच्या वर्षी पावसामुळे द्राक्षाचे गणित कोलमडले असल्याने रोगराई पसरणार असल्याने औषध फवारणी अधिकची करावी लागणार असून त्याचा खर्च देखील वाढणार आहे.

गेल्या तीन वर्षापासून द्राक्षबागादारांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादित शेतीमालास योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग अर्थिक संकटात सापडलेला. अशातच रेंगाळलेला पाऊस आणि लवकर पडलेली थंडी यामुळं द्राक्ष हंगाम एक दीड महिना पुढे ढकलला गेला. त्यामुळे द्राक्ष चाखण्यासाठी वेळ तर लागेलच पण द्राक्षाला मिळणारा भावही यंदाच्या वर्षी कमी लागणार आहे. शिवाय, प्रतिकूल हवामान, वाढलेला भांडवली खर्च पाहता शेवटी पदरी काय ? हा सवाल कायम आहेच.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!