Just another WordPress site

तो चालतोय, तो चिडतोय, तो भिडतोय, तो लढतोय!

राहुल गांधी पबमध्ये जाऊन दारू पितो. परदेशात जाऊन मज्जा करतो. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्न खात पिक्चरही बघतो. तो दारू पीतही असेल. पबमध्ये जातही असेल. परदेशात पर्यटन करतही असेल. त्याचे इतके काय? हे सगळे का करू नये? आनंद घेणे हेच तर प्रखर जीवनासक्तीचे मुख्य लक्षण आहे आणि प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत वेगळी आहे. कुणाला कीर्तनातून आनंद मिळतो तर कुणाला पिक्चर पाहण्यातून. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.‌ तसा तो राहुलचाही खासगी प्रश्न आहे. त्याने लग्न केले काय आणि नाही केले काय, लग्न करून परदेशात बायको लपून ठेवली काय? याचे मला तरी काहीच घेणे देणे नाही. पण, चार दिवसांपासून त्याच्यासोबत मी, माझा सहकारी Atul Patil अतुल पाटील चालतोय.‌ राहुल आणि इतर हजारो जण तर दोन महिन्यांपासून चालत आहेत. ते चालायला लागलेत तेव्हा पाऊस होता. मध्ये अनेक ठिकाणी तर वादळी पाऊस झाला. पावसातच त्याने काही सभाही घेतल्या. त्याही वादळी. आता कडाक्याची थंडी आहे. तो कशासाठी चालतोय? सत्तेसाठी असे अनेक जण म्हणतील. हो तसे आहेही. ती त्याची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे.‌ तिच्याशी मला तरी काही घेणे-देणे नाही. पण, चालता चालता त्याने समाजवादाची मशाल हाती घेतली. तिच्या लख्ख प्रकाशात तो पाहतोय धार्मिक ध्रुवीकरणात विभागलेला ‘भारत’. जो भारत अखलाकला ठेचून मारणारा, भोंग्यावरून माथी भडकवणारा, शेतात राबराब राबणारा तरीही मालाला भाव नसलेला, पदव्यांचे पुटुळे घेऊन नोकरीसाठी रांगेत असलेला, दिवाळीसाठी पेटविलेल्या दिव्यात उरलेल्या तेलातून भाजीला फोडणी देणारा, वेशीच्या मुसीतच जातीयवाद, कट्टरता लपवलेली गावे. तो पाहतोय धर्माच्या, जातीच्या, कुळाच्या खोट्या अस्मिता. मुलगी झाली म्हणून चेहरा पाडून बसलेला बाप. गरिबी, महागाई, घटलेले उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांना झालेला ताप हे सगळं-सगळं तो पाहतोय. हे आर्थिक भ्रष्टाचारामुळे असेल कदाचित. पण, त्याहीपेक्षा सांस्कृतिक दहशत, सामाजिक भ्रष्टाचार यामुळे हे अधिक खोलवर रुजलेले आहे.
त्या विरुद्ध तो चालतोय, तो चिडतोय, भिडतोय, लढतोय. त्याच्या पक्षातील लोकंही आता ही भाषा बोलत आहेत. हे परिवर्तन मोठे आहे. हे मला महत्त्वाचे वाटतेय. त्याचे हेच विचार ऐकून कर्नाटकातील पंचवीशीतील अभियंता राहुल दाताह त्याच्यासोबत चालायला लागला. ‘राजकारणात यायचे का?’ असे त्याला विचारले. तो म्हणाला “नाही”. त्याला म्हटले, “मी पत्रकार आहे. तू का चालतोय हे आमच्या वाचकांना सांगायला स्टोरी करतो.” तो हसला. प्रसिद्धी अजिबात नको म्हणाला. मला भारत समजून घ्यायचाय, असे त्याने सांगितले.
छत्तीसगडची अॅड. पार्वती साहू ही कन्याकुमारीपासून सोबत आहे. ती देगलूरमध्ये भेटली. विचारले, ‘एकटी मुलगी घराबाहेर पडली. तिकडे कुटुंबीयांना भीती नाही वाटत?’ ती म्हणाली, “एकट्या मुलीला मुलगी आहे म्हणून घराबाहेर पडायला भीती वाटू नये, यासाठीच तर मी चालतेय अन् इथे मी एकटी कुठेय?” चालून चालून दमलेली आणि मूळ मराठवाड्यातील असलेली रुक्साना पाटील ही तिशीतील तरुणी सावलीला उभी राहून गटागटा पाणी पिताना दिसली. तिला बोलते केले. पुण्यात राज्यशास्त्राची प्राध्यापक असलेल्या रुक्सानाने माझा समाजशास्त्राचा वर्ग घेतला. वर्ण, रंग, जात, धर्म सांगता-सांगता तिने मला थोडक्यात राजकारणही समजावून सांगितले.
विदर्भातून आलेला संकेत कुलकर्णी म्हणाला, “ही यात्रा महात्मा गांधींच्या विचारांची आहे. गांधीला गोळ्या घातल्या तरी गांधी मरणार नाही.” विदर्भातूनच आलेली नेहल देशमुख ही तरुणी सुरुवातीपासूनच यात्रेत आहे. तिला राजकारण यायचेय. त्यासाठी ती चालतेय. उत्तर प्रदेशातील श्रावण पांडे या तरुणाचेही असेच. राहुल याच्या सोबत पायी चाललो तर राजकीय करिअर सेट होईल, असे त्याला वाटतेय. राहुल याच्या सोबत चालणार्‍यांपैकी काही विचारांसाठी चालत आहेत तर काही राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन चालत आहे. काहीही असो! पण, यातून कधी नव्हे ते कॉंग्रेसची समाजवादीसाठीची तळमळ दिसून आली. सध्या देशातील द्वेशाला दूर करण्यासाठी ‘नफरत छोडो, देश जोडो’ हा संदेश यातून मिळतोय. समाजवाद काय आहे आणि तो का आवश्यक आहे हे भारत जोडो यात्रेत वाजणारी गाणी, घोषणा यातून किशोरवयीन पोरांना कळत आहेत. कट्टरतेचा विचार कानी पडणार्‍यांना समाजवादाची चर्चा ऐकायला मिळत आहे. ते त्याला भेटण्यासाठी रस्त्याने पळत आहेत. तोही आपली सुरक्षा बाजूला सारून त्यांना हात देत आहे. त्याला ‘राहुलजी, ‘राहुल सर’, ‘साहब’ असे काहीही म्हटले नाही तरी चालेल. जवळच्या मित्राप्रमाणे ‘राहुल-राहुल’ असे एकेरी ओरडत गर्दी त्याला प्रचंड प्रतिसाद देतेय. पाया पडलेले त्याला आवडत नाही. कुणी पायाकडे हात नेताच झटक्यात तो त्याला वर घेऊन मिठ्ठी मारतो आणि ‘खांद्याला खांदा’ लावून सोबत चालायला लागतो. असेच सोबत घेतलेल्यांनी त्याच्या वडिलांचा घात केला. आजीच्या निडर छातीची चाळणी केली. हे त्याने कोवळ्या वयात पाहिले. तरीही द्वेश, भीती विसरून तो प्रेमाने आलिंगन देतो. ‘नफरत छोडो देश जोडो’ म्हणत चालायला लागतो; कारण मला तरी अनिरुद्ध वनकर यांच्या ‘वादळवारा’ कवणाप्रमाणे बुद्ध घेऊन चालणारा तो वादळवारा आणि क्रांतीचा नारा वाटतो.

समाजवाद जिंदाबाद!

 

(पत्रकार विकास देशमुख यांच्या फेसबुक वॉलवरून)
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!