Just another WordPress site

चीनमध्ये कोरोनाचे थैमान! २४ तासात तब्बल ३ कोटी ७० लाख जणांना लागण

जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले असून जगभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या सख्येत वाढ होत आहे. चीनमध्ये तर कोरोनाने हाहाकार घातला असून एका दिवसात तब्बल साडे तीन कोटी नागरिक कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतचे वृत्त चीन सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी दिले आहे.

चीनमधील अनेक शहरं कोरोनाच्या विळख्यात सापडली असून अनेकांना रुग्णालयात बेड देखील मिळत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर उपचारासाठी रुग्णालय आणि मेडिकलबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या असल्याचं देखील बातम्यामध्ये म्हटलं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना, चीन सरकारच्या एका अधिकाऱ्याने आकडेवारीबाबत सांगितलं की, ”या आठवड्यात एकाच दिवसात ३७ दशलक्ष (३ कोटी, ७० लाख) कोरोनाबाधित (Corona) प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा आकडा जगातील एका दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकी नुसार डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत किमान २४८ मिलियन लोकांना म्हणजेच जवळपास १८ टक्के लोकसंख्येला या व्हायरसची लागण झाली असण्याची शक्यता आहे”. (Corona Update News)

याबद्दल बोलताना डेटा कन्सल्टन्सी मेट्रोडेटाटेकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ चेन किन म्हणाले, ”चीनमधील बहुतेक शहरे डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून ते जानेवारीच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असेल. कारण सध्या शेन्झेन, शांघाय आणि चोंगकिंग शहरांमध्ये लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सध्या चीनमधील बीजिंग, सिचुआन, अनहुई, हुबेई, शांघाय आणि हुनानमध्ये कोरोनाबाधितांची स्थिती जास्त बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच कोविड आढावा बैठक घेण्याची शक्यता असून ते या बैठकीनंतर लॉकडाऊनची देखील घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!