Just another WordPress site

माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका, दुर्दैवाने काही बरंवाईट घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार; ‘या’ खासदारचं खळबळजनक पत्र

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार केला आहे. सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक संरक्षणात कपात केली आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असं या पत्रात राजन विचारे यांनी नमूद केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापनेनंतर ठाण्यात नेहमीच काहीना काही कारणावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनसामने आल्याचे पाहायला मिळालं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील पदाधिकारी आणि नेत्यांना मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र, आता ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. यामुळे विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. राजन विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेऊन पत्र व्यवहार केला आहे. कपात केलेले अंगरक्षक पोलीस यांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाकडून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर आणि सूडबुद्धीने तडीपार करणे, एमआरटीपी, प्रक्षोभक भाषण, खोट्या चॅप्टर केस टाकणे, आक्षेपार्ह घोषणा दिल्या बद्दल नोटीस बजावण्यात येत आहेत. तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे,वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला जात असल्याचे या पत्रामध्ये विचारे यांनी नमूद केले आहे.

ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहराशी संलग्न असलेला मतदार संघ असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार रात्री – अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांशी थेट जनसंपर्कामुळे मतदार संघात सन २०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४०हजार ९६९ मते मिळून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो आहे. परंतु शासनाने सूडबुद्धीने अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्यामुळे हा एक षडयंत्राचा भाग वाटत असल्याची शंका यावेळी राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे.

शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना शासकीय व राजकीय असे कोणतेही उच्च पद नाही त्यांना पोलीस अंगरक्षक पुरविण्यात येतात. परंतु, लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार यांची अंगरक्षक पोलीस सुरक्षा कमी केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अंगरक्षक पोलीस सुरक्षा पूर्वरत करण्यात यावी, अशी मागणी राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच दुर्दैवाने अशी काही दुर्घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!