Just another WordPress site

१ ऑक्टोबरपासून बँकिंगसह ‘या’ नियमांत होणार बदल; तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले. दर महिन्यात काहीतरी बदल होत असतात. त्यातही हे नियम जर आर्थिक बाबींशी संबंधित असतील तर आपण वेळीच त्यांची दखल घेतली पाहिजे. कारण, याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार असतो. १ ऑक्टोबरपासून बँकिंग नियम, एलपीजीच्या दर यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते. त्यामुळे जाणून घेऊया, १ आक्टोबर पासून होणाऱ्या बदलांविषयी.

 

महत्वाच्या बाबी

१. आता १ तारखेपासून म्युच्युअल फंडात नामांकन आवश्यक
२. १ ऑक्टोबरपासून कार्ड टोकनायझेशनचे नियम होणार लागू
३. डिमॅट खात्यात 2 Factor Authentication चा Enable करा
४. गॅस सिलिंडरच्या दरातही मोठे बदल होण्याची शक्यता

 

म्युच्युअल फंडामध्ये नामांकन आवश्यक

तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. सेबीने म्युच्युअल फंड धारकांसाठी नामांकनाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. नवीन नियमांनुसार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी १ ऑक्टोबरपासून नॉमिनेशनची माहिती देणे आवश्यक आहे.

Card Tokenisation नियम लागू

देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. १ ऑक्टोबरपासून डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे होणारी फसवणूक पाहता, कार्ड टोकनायझेशनचे नियम लागू होणार आहेत. या पूर्वी हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार होता. जूनच्या शेवटी रिझर्व्ह बॅंकेने टोकनायझेशनची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवून ३० सप्टेंबर २०२२ केली होती. आता १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.

अटल पेन्शेन योजनेचा फायदा मिळणार नाही

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ५,००० रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. १८ वर्ष ते ४० वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते. पण आता १ ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. वित्त मंत्रालयाने जारी नवीन आदेशानुसार, जर एखादा ग्राहक १ ऑक्टोबर २०२२ रोजी किंवा त्यानंतर या योजनेत सामील झाला आणि अर्जाच्या तारखेला किंवा त्यापूर्वी प्राप्तिकर भरला असेल तर त्याचे अटल पेन्शन योजना खाते बंद केले जाईल. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित आणि PFRDA द्वारे संचालित एक हमी पेन्शन योजना आहे.

डीमॅट खाते आणि शेअर्समधील गुंतवणूक

शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट हे खूपच गरजेचे असते. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये Two Factor Authentication चा पर्याय ३० सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. असे केले नाही तर तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल

दर महिन्याच्या १ तारखेला सिलिंडरच्या किमती बदलतात. १ ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. जर कंपनीने एलपीजीच्या किमतीत बदल केला तर किमती कमी होण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

अल्पबचत योजनांचे व्याजदर

केंद्र सरकारद्वारे सर्वसामान्यांसाठी अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात. या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित तर असतातच परंतु त्याचबरोबर त्या चांगले व्याजदेखील देतात. यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, आणि राष्ट्रीय बचत योजना या सर्वात लोकप्रिय योजना आहेत. सरकार दर तिमाहीत या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बदल करत असते. पुढील महिन्यापासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ होऊ शकते.

रेपो दर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबर रोजी व्याज दर जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे महाग होणार आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!