Just another WordPress site

मुलाला शाळेत नेणाऱ्या बसमध्ये ‘एफएपीएस’ यंत्रणा आहे का?

स्कूल बसगाड्यांमध्ये एफएपीएस यंत्रणाच नाही : आरटीओंचे दुर्लक्ष

अकोला : स्कूल बसमधील मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने (Central government) २७ जानेवारीपासून संपूर्ण देशात महत्त्वाचा नियम लागू केला आहे. स्कूल बसेसमध्ये फायर अलार्म  आणि प्रोटेक्शन सिस्टिम (Fire alarm and protection system) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपघात किंवा अन्य कारणाने आग लागल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविणे सोपे जावे यासाठी ही यंत्रणा आहे. परंतु, अकोला शहरातील (Akola News) अनेक स्कूल बसेसमध्ये (School buses) एफएपीएस (FAPS) यंत्रणाच नसल्याची बाब समोर आली आहे.

अनेकदा स्कूल बस सोबतच इतरही प्रवासी गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये लोकांचा जीव गमावण्याच्या संख्येत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने प्रवासी बस आणि स्कूल बसमधील सुरक्षेशी संबंधित नियम आणखी कडक केले आहेत. रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने अशा बसेसमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही शहरात धावणाऱ्या अनेक स्कूल बसेसमध्ये ही एफएपीएस यंत्रणा नसल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनात बंधनकारक

■ बसेसला आग लागून प्रवाशांचा मृत्यू होत असलेल्या अपघातांची संख्या पाहता, शाळकरी मुले आणि रस्त्यावरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात २८ एप्रिल रोजी अंतिम अधिसूचना जारी केली आहे.

■ स्कूल बसेस आणि सार्वजनिक वाहतूक बसेसमध्ये एफएपीएस बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १ ऑक्टोबर २०२२ पासून नवीन बसेसमध्ये ही उपकरणे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

काय आहे, एफएपीएस यंत्रणा ? 

स्कूल किंवा प्रवासी बसेसमध्ये ज्या भागामध्ये विद्यार्थी, प्रवासी बसतात, त्या भागामध्ये गाडीमध्ये आग लागताच धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी प्रणाली आणि आग संरक्षक प्रणाली यालाच एफएपीएस यंत्रणा म्हणतात.

शहरात शालेय वाहतूक करणारी एक हजार वाहने

शहरासोबतच जिल्ह्यात शालेय वाहतूक करणारे ६०० च्या जवळपास वाहने आहेत. यात ४५० च्या जवळपास स्कूल बसेस आहेत. परंतु अनेक स्कूल बसेस किंवा इतर वाहनांमध्ये फायर अलार्म आणि प्रोटेक्शन सिस्टिम बसविण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

 

आग लागल्यानंतर होणारी हानी टळणार

■ बसमध्ये धूर वाढल्यावर अलार्म वाजवण्यासोबतच हे उपकरण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत करेल. प्रवासी बसतील त्या ठिकाणीही ही एफएपीएस यंत्रणा बसवावी लागणार आहे.

■ हे उपकरण बसवल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि सार्वजनिक वाहतूक बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षिततेचे कवच मिळणार आहे. त्यांचा प्रवास अतिशय सुरक्षित आणि सुरक्षित होईल.

आरटीओच्या नियमानुसार सर्व स्कूल बसगाड्यांची नियमित तपासणी करून नियमांचे पालन होते की नाही हे पाहिल्या जाते. आता नवीन नियमानुसार स्कूल बसगाड्यांमध्ये फायर अलार्म आणि प्रोटेक्शन सिस्टिम लावावी लागणार आहे.

-जयश्री दुतोंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!