Just another WordPress site

लम्पीनंतर आता शेतकऱ्यांसमोर नवं संकट, सेलू तालुक्यातील शिराळ्यामध्ये ११ बैलांच्या जिभा गळून पडल्या, शेतकऱ्यांसह डॉक्टरही संभ्रमात

परभणी : लम्पी आजाराच्या संकटातून शेतकरी सावरत असताना पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता पुन्हा शेतकऱ्यांवर वेगळेच संकट आले. रात्रीतून रक्तस्राव होऊन बैलाची जीभ गळून पडत असल्याची घटना समोर आली. सेलू तालुक्यातील शिराळा गावातील ११ बैलांच्या जिभा गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
सेलू तालुक्यातील शिराळा गावातील शेतकऱ्यांनी आपले बैलं गोठ्यामध्ये बांधली होती. बैलांना कुठलाच आजार नव्हता. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांनी टाकलेलं वैरणही बैलांनी व्यवस्थित खाल्लं. नंतर शेतकरी घराकडे गेले. सकाळी शेतकऱ्यांनी गोठ्यात येऊन बैलांची पाहणी केली असता बैलाच्या तोंडामधून रक्तस्राव होऊन त्यांची जीभ आपोआप गळून पडली असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आलं. हा प्रकार घडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिराळा गावाला भेट देऊन सदरील बैलांची तपासणी केली. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुटलेली जीभ तपासणीसाठी पाठवली असून त्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. असा प्रकार केवळ बैलांच्या बाबतीत होत असून गाय किंवा म्हशींमध्ये असं काही दिसलं नाही. अशा विचित्र प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून याचे योग्य निदान करण्याची मागणी होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!