Just another WordPress site

‘धर्मवीर’नंतर दिसणार प्रसाद ओक दिसणार ‘या’ दिग्गज रंगकर्मीच्या भूमिकेत

बायोपिक चित्रपटांची सध्या लाटच आलेली आहे, केवळ हिंदीतच नव्हे तर मराठीतदेखील चांगले बायोपिक येऊ लागलेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट मागच्या वर्षी सुपरहिट ठरला. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. आता प्रसाद आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिलीये.
छोटा आणि मोठा असे दोन्ही पडदे गाजवलेला मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांचा अत्यंत आवडता आहे. त्याच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना पसंत पडल्या. प्रसाद कायमच त्याच्या कामामुळे चर्चेत राहिलाय. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. गेल्यावर्षी ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. खरंतर प्रसादनं आजवर शंभरहून अधिक चित्रपट केले. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख मिळाली ती ‘धर्मवीर’ या चित्रपटातून. ‘धर्मवीर’ हा त्याचा पहिला बायोपिक.. या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळं प्रसादची प्रचंड वाहवा झाली. या चित्रपटातील प्रसादचा लूक पाहून सगळ्यांना अक्षरशः आनंद दिघे यांना पाहिल्याचा भास झाला. एवढी ती भूमिका खरी वाटत होती. त्याचा ‘धर्मवीर’चा सर्व प्रवास आता ‘माझा आनंद’ या पुस्तकातूनही समोर आलाय. अशा प्रकाशझोतात असतानाच प्रसादने चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.
‘धर्मवीर’नंतर तो आता मराठीतले दिग्गज दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘तोच मी… प्रभाकर पणशीकर’. एक पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत त्याने लिहिलं, ‘नवं वर्ष, नवं स्वप्न, सोबत जुनेच कलावंत आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत.’

त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीये. सिद्धार्थ जाधव, संदीप पाठक, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, प्राजक्ता गायकवाड, सुबोध भावे, मंजिरी ओक अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रसादच्या पोस्टवर कमेंट करत त्याला नव्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्यायेत. तर दुसरीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून प्रसादला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी नेटकरीही आतुर झालेत.
दरम्यान, प्रसाद ज्यांची भूमिका या सिनेमात साकारतोय, ते प्रभाकर पणशीकर म्हणजेच पंत हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते आणि नाट्यनिर्माते होते. मूळचे मुंबईचे असलेले पणशीकरांचा लहान असतानाच त्यांचे रंगभूमीशी संबंध आले. ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ‘खडाष्टक’ अशा नाटकांमधून काम केले. प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘ इथे ओशाळला मृत्यू’, अश्रूंची झाली फुले ही त्यांची गाजलेली नाटके.. पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठी रंगभूमीसोबतच त्यांनी गुजराती, कन्नड भाषेत काम केले आहे. अभिनयाच्या बरोबरीने त्यांची स्वतःची नाट्यसंपदा नावाची निर्मिती संस्था काढली. २०११ रोजी त्यांचे निधन झाले. आता त्यांची व्यक्तीरेखा प्रसाद मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.

दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. नुकताच अभिजीत यांचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येऊन गेला. तर या आधीही त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट केले आहे. अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा बायोपिकचे दिग्दर्शनही त्यांनी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!