Just another WordPress site

अभिनेता भरत जाधवच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे आता अमेरिकेतही होणार प्रयोग, भरतने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

मराठी मनोरंजनसृष्टीचा सुपरस्टार भरत जाधवचं नाटकावर असलेलं प्रेम सर्वांनाच माहीत आहे. भरत जाधवचं रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे आता अमेरिकेतही प्रयोग होणार आहेत. या नाटकाचे आजवर अनेक प्रयोग झाले असून हेच नाटक आता अमेरिकेत पोहोचले. भरत जाधव आणि टीम सध्या अमेरिकेत असून तिथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. भरतने यासंदर्भातील एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून त्यात त्याचे सहकलाकार देखील आहेत.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘मोरूची मावशी’ नाटकाचे आता अमेरिकेतही होणार प्रयोग
२. १ मे १९६३ रोजी झाला होता मोरूची मावशीचा पहिला प्रयोग
३. मोरूची मावशी हे गाजलेलं नाटक आचार्य अत्रे यांनी लिहिलं
४. पहिल्यांदा मावशीची भूमिका बापूराव माने यांनी साकारली होती

 

नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील नाना माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. तो सोशल मीडियावर सक्रिय असून त्याच्या पोस्ट कायम लक्षवेधी असतात. सोशल मीडिया अकाउंटवरून तो कधी मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आज त्याने त्याच्या अमेरिका दौऱ्याविषयी माहिती दिली. हा काही फक्त साधा दौरा नाही, तर भरतच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार आहेत.

सामान्यपणे प्रथमतः नाटक रंगभूमीवर येतं आणि नंतर त्याचा चित्रपट होतो. पण पहिले चित्रपट आणि नंतर नाटक असा उलट प्रवास झालेलं सुपरहिट नाटक म्हणजे ‘मोरुची मावशी’. ‘टी.डी.’ ही पदवी मिळवण्यासाठी आचार्य अत्रे इंग्लंडला गेले असताना ‘चार्लीज आन्ट’ या नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला होता. ब्रॅन्डन ‌टॉमस लिख‌ित हे इंग्रजी प्रहसनवजा नाटक आचार्य अत्रे यांनी त्यानंतर वाचलं. या धमाल नाटकाच्या कथेवरून आचार्य अत्रे यांनी ‘मोरूची मावशी’ हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शितही केला. त्याला मोजका प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चित्रपटावर आधारित नाटक आचार्य अत्रे यांनी लिहिलं ते मात्र सुपरहिट ठरलं. आजही हे नाटक धुमाकूळ घालत आहे. १ मे १९६३ रोजी महाराष्ट्र दिनी ‘मोरूची मावशी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला होता. त्यावेळी त्यात मावशीची भूमिका साकारली होती बापूराव माने यांनी. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करायचं ठरलं आणि मावशीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना पण त्यांनी नाव सुचवलं ते विजय चव्हाण यांच. आणि विजू मामांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. त्यानंतर मावशी साकारायची संधी भरत जाधवला मिळाली. भरतनेही ती भूमिका जीव ओतून केली. या नाटकाचे शेकडो प्रयोग भरतने भारतभर केले. आता हे नाटक चक्क अमेरिकेत पोहोचले आहे. त्याच संदर्भात भरतने पोस्ट केली आहे.

या नाटकविषयीची पोस्ट शेअर करत भरत म्हणतो, ‘मावशी दाखल झालीये अमेरिकेत..!!! पाच आठवडे, १५ प्रयोग, फुल्ल ऑन टांग टिंग टिंगा..’ यासोबतच त्याने सर्व प्रयोगांचे तपशील दिले आहेत.’ १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर अमेरिकेतील शहरात हे नाटक होणार आहे. पहिला प्रयोग सेन होजे इथे होणार असून बाकीचे प्रयोग सॅन डियागो, बोस्टन, लॉस एन्जलीस, बोस्टन यांसह अनेक ठिकाणी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!