Just another WordPress site

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मोठी चुरस, नेमका कुणाचा गेम होणार, अन् कोण ठरणार विजयाचा शिलेदार?

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी उमेदवारी दाखल केली. दरम्यान, पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूने तयारी सुरू करण्यात आली असून दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात येतोय. याच निमित्ताने या निवडणुकीत कोण बाजी मारेल? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप
२. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी
३. भाजपकडून मुरजी पटेल यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
४. या निवडणुकीत ऋतुजा लटके बाजी मारणार की मुरजी पटेल?

 

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होतेय. ३ नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली, तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्त्वपरीक्षाच आहे. कारण, या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावं लागलं. त्यामुळं मुंबईतील ही पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार असून या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला लागली.

खरंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा तसा संमिश्र लोकवस्तीचा आहे. या संमिश्र लोकवस्तीचा आणि येथील मतदारांचा कल २०१४च्या पूर्वीपर्यंत नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहात असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची या मतदारसंघावर उत्तम पकड होती. एका अर्थाने अंधेरीचा हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सुरेश शेट्टी याच मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. मात्र, २०१४ नंतर हे चित्र बदललं आणि त्यानंतर दोन वेळा शिवसेनेचे रमेश लटके निवडून आले. मात्र, इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ मध्ये रमेश लटके विजयी झाले होते. मात्र, भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा केवळ ५ हजार मतांनी पराभव झाला होता. पुढं २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन आमदार रमेश लटके यांना युतीने उमेदवारी दिली. तर २०१५-१६ मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांनी २०१९ ला विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मतं होती.

नगरसेवक म्हणून लटके यांचा अंधेरी पूर्व भागात वर्षानुवर्षे राहिलेला वावर आणि त्यांचा जनसंपर्क या दोन गोष्टी शिवसेनेसाठी नेहमीच पोषक ठरल्या, त्यामुळं या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपला वरचढ ठरेल, असं राजकीय जाणकार सांगतात. मात्र, असं असलं तरी भाजपला मानणारा एक मोठा मतदार या मतदारसंघात आहे हे मागील दोन्ही निवडणुकांनी दाखवून दिले, हे देखील नाकारता येणार नाही.

या निवडणुकीतील दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे, रमेश लटके यांचं निधन झालं आहे आणि त्यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या आहेत, यामुळे सुद्धा फरक पडू शकतो. आता शिवसेनेसाठी जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघातले काँग्रेसचे मतदार शिवसेनेला मतदान करू शकतात. तसंच सहानुभूतीच्या जोरावरही शिवसेना बाजी मारू शकते. मात्र, उद्धव ठाकरेंकडे आता धनुष्यबाण हे चिन्ह नाही, त्यामुळं ही निवडणुक ठाकरे गटासाठी आव्हानात्मक असल्याचं बोलल्या जातं.

मुंबईतील काही ठराविक भागांप्रमाणे अंधेरी पूर्वचा मतदारसंघ हा काही मराठमोळा नाही. या मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास २ लाख ७० हजार एवढी आहे. उच्चभ्रू वसाहती, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्या अशी संमिश्र वस्ती या भागात आहे. यात मराठी भाषिक, उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन मतदार मोठ्या संख्येने असल्याचं जाणकार सांगतात. काँग्रेस आणि शेट्टी यांच्या मदतीला हा अमराठी मतदार नेहमीच धावून जात असे. मराठी आणि गुजराती मतदारांच्या जोरावर रमेश लटके हेदेखील येथून शेट्टी यांना कडवी लढत देत असत. मात्र, २०१४ मध्ये येथील अमराठी मतदारांनी भाजप उमेदवार सुनील यादव यांना भरभरून मतदान केल्याचे दिसून आले होते. यंदाही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची याच मतदारांवर आणि त्यातही विशेषत: गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मतदारांवर भिस्त असेल असेच दिसते.

या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, तर भाजपचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यासह लढत आहे. दरम्यान, अंधेरी पूर्वचं आजवरच राजकीय समीकरण बघितलं तर मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदाराचा कल कोणत्या बाजूला जातो, यावर निकालाचं चित्र अवलंबून आहे. त्यामुळं येथील परंपरागत काँग्रेसचा मतदार कोणती भूमिका घेतो हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!