Just another WordPress site

यंदा ३६.६ अब्ज दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन; का वाढते CO₂ चे प्रमाण? कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय करता येईल?

प्रदूषण हा समस्त जगापुढील सर्वांत गंभीर प्रश्न आहे. उद्योग, वाहने तसेच अन्य मानवनिर्मित बाबींमुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडसह इतर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रणाम दिवसेंदिवस वाढतच चालले. या वायूंचे अशाच प्रकारे उत्सर्जन कायम राहिले तर पृथ्वी आगामी पिढ्यांसाठी वास्तव्य करण्यायोग्य राहणार नाही. दरम्यान, तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या उत्सर्जनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.७ टक्क्यांची भर पडली. त्याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. जगातील कार्बन उत्सर्जनास श्रीमंत देशच जबाबदार
२. २०२२ वर्षांत ३६.६ अब्ज दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन
३. ३ अब्ज लोकांना कार्बन उत्सर्जनाचा धोका; आयपीसीसी
४. कार्बन उत्सरर्जनात सगळ्यात मोठा वाटा सिमेंटचा

 

कोळशाचा अद्याप कायम असलेला वापर, तसेच पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूची वाढती मागणी यामुळे कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या उत्सर्जनात गेल्या वर्षीच्या कमालीची वाढ होतांना दिसतेय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात १.७ टक्क्यांची भर पडली. तापमानवाढ रोखण्यासाठी जगभरात विचारमंथन सुरु असतानाच हे वास्तव समोर आल्याने चिंता व्यक्त होतेय. कार्बन डाय ऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश असलेल्या चीनमधून मात्र २०२१ च्या तुलनेत ०.९ टक्के उत्सर्जन कमी झाले आहे, तर अमेरिकेमधून १.५ टक्के उत्सर्जन अधिक झाले आहे.

 

कार्बनचे प्रमाण तापमानवाढीला कारणीभूत

‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ या कार्बन उत्सर्जनाची नोंद ठेवणाऱ्या संस्थेने या वर्षीसाठीचा आपला अहवाल इजिप्तमध्ये सुरु असलेल्या हवामान बदल परिषदेत प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, जगातील कार्बनच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होते. मात्र, असं असं तरी १५ वर्षांपूर्वी ते ज्या वेगाने वाढत होत होती, तितका वेग सध्या नाही. मात्र, तरीही हवेतील कार्बनचे प्रमाण वाढतच असल्याने आणि ते तापमानवाढीला कारणीभूत ठरत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं. एकूणच ही स्थिती कायम राहिल्यास त्याचा सामना करणे मानवाला दिवसेंदिवस अवघड जाईल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला.

 

ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ प्रोजेक्टमधील नेमकी निरीक्षणं काय?

१. २०२२ वर्षांत ३६.६ अब्ज दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन झालंय.
२. यंदा जागतिक उत्सर्जनात १.७ टक्के वाढ झाली.
या अहवालात असंही सांगितलं की, भारतातील उत्सर्जनात सहा टक्के वाढ झाली.
३. तर युरोपमधील उत्सर्जनात ०.८ टक्के घट झाली.
४. कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणात एक टक्क्याची वाढ झाली.
५. तेलामुळे होणाऱ्या प्रदूषणात दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं निरिक्षण या अहवालात सांगितलं.

 

नेमकं का वाढते CO₂ चे प्रमाण?

असे म्हटले जाते की, जगात पाण्यानंतर जर एखाद्या वस्तूला मागणी असेल तर ते म्हणजे सिमेंट. या पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जे काही बांधकाम केले जाते त्यात सिमेंट हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो. अगदी घराच्या बांधकामापासून ते धरणाच्या भिंतीपर्यंत सिमेंटचा वापर अनिवार्यपणे केला जातो. आणि बहुधा याचमुळे सिमेंट उद्योगावर टीका होत असते. कारण यातून उत्सर्जित होणारे कार्बन-डाय-ऑक्साईड. जगात होणाऱ्या सर्व प्रदूषणापैकी एकट्या सिमेंट उद्योगाचा वाटा आठ टक्के आहे. याशिवाय, कोळसा, तेल, गॅस यांसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. पृथ्वीवर सर्वत्र याच इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने वायू उत्सर्जनही त्या प्रमाणात वाढते. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात जातो. पृथ्वीवर आच्छादन असावे अशा प्रकारे तो तिथे राहतो. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचं मत आहे.

 

कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश

अमेरिका आणि चीन हे कार्बन डाय ऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश आहेत. २०२१ पर्यंत चीनमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी वाढते होते, तर अमेरिकेतील प्रमाण घटत होते. या वर्षी मात्र परिस्थिती उलट झाल्याचे दिसून आले आहे. संसर्ग स्थितीतून बाहेर पडल्यानंतर वाढलेल्या घडामोडींचा आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जासंकटाचा परिणाम या देशांमधील बदलांवर दिसून आला असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

 

तीन देशांमध्ये झिरो कार्बन

जेव्हा अखंड जग जलवायू परिवर्तनाच्या धोकादायक संकटाचा मारा सहन करत आहे, तेव्हा जगातीलच तीन देश सुखाची आणि स्वच्छ हवेत झोप घेत आहेत. विकसनशील देशांना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे सांगण्यात आले आहे. हे एक मोठे आव्हान आहे. असे असताना जगातील तीन देशांमध्ये झिरो कार्बन आहे. भूतान, सुरीनाम आणि पनामा या तीन देशांना कार्बन निगेटिव्ह देश म्हणून घोषित करण्यात आले.
भूतानने नेट-झिरो प्रतिज्ञा घेतली नव्हती, कारण भूतानला त्याची गरजच नव्हती. भूतानची जंगले वर्षाला सुमारे ९ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. तर या देशातून दरवर्षी होणारे एकूण कार्बन उत्सर्जन ४ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे. तर सूरीनाममध्ये पृथ्वीवरील सर्वात घनदाट जंगल आहेत. तिसरा देश खूप प्रसिद्ध आहे, पनामा. दक्षिण अमेरिकेतीलच हा देश आहे. डोंगररांगा, नद्या आणि उष्णकटीबंधीय प्रदेश आगे. या देशाचा ५७ टक्के भूभाग हा वनसंपदांनी नटलेला आहे. २०२३ पर्यंत इंधन आणि कोळसा बंद करण्याचे पनामाचे उद्दिष्ट आहे.

 

उत्सर्जनात निम्म्याने घट आवश्यक

तीव्र तापमान टाळण्यासाठी जागतिक सरासरी तापमानवाढ औद्योगिकीकरणपूर्व कालावधीच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दीष्ट पॅरिस येथील परिषदेत निश्‍चित करण्यात आले होते. पृथ्वीच्या वातावरणात आणखी ३८० अब्ज दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साइड सोडल्यास १.५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला जाईल. कार्बन डाय ऑक्साइड हवेत मिसळला जाण्याचे सध्याचे प्रमाण पाहता, पुढील नऊ ते १० वर्षांमध्ये इतक्या प्रमाणात कार्बन हवेत मिसळला जाईल. म्हणजेच, २०३१ किंवा २०३२ या वर्षापर्यंत तापमानात मोठी वाढ होऊ शकते. हे टाळण्यासाठी २०३० पर्यंत उत्सर्जनात निम्म्याने घट आवश्‍यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

 

महाराष्ट्रातली हवा होणार अधिक विषारी?

देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधले नागरिक गेल्या काही दिवसांपासून हवा प्रदूषणाला तोंड देत आहेत. दिल्लीतल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३५४ पेक्षाही जास्त आहे. त्यामुळे काही दिवस शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्याची वेळ दिल्ली सरकारवर होती. एकूणच काय, तर हवा प्रदूषणाच्या समस्येमुळे दिल्लीतली परिस्थिती गंभीर झाली. येत्या वर्षभरात महाराष्ट्रामध्येसुद्धा अशीच स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. २०२३ मध्ये महाराष्ट्रातल्या एरोसोल प्रदूषणाची पातळी आणखी वाढेल. महाराष्ट्रातली हवा ‘अत्यंत असुरक्षित’ असलेल्या ‘रेड झोन’ या श्रेणीमध्ये येण्याची शक्यता आहे, असं एका अभ्यासात म्हटलंय. ऑगस्ट महिन्यामध्ये एल्सव्हियर या पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये भारतातल्या राज्यस्तरीय एरोसोल प्रदूषणाविषयी सखोल माहिती देणारं एक संशोधन प्रकाशित झालं. या संशोधनामधल्या माहितीनुसार, २०२९ आणि २०२३ दरम्यान राज्यातल्या एओडीमध्ये सुमारे ७ टक्के वाढ होऊ शकते.

दररम्यान, कार्बन डायऑक्साईडच्या उत्सजर्नासंदर्भात ऑक्सफॅम या संस्थेचा अहवाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जगभरातील श्रीमंत लोक प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जसाठी कारणीभूत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालामध्ये देण्यात आलेली आकडेवारीदेखील चक्रावून सोडणारी आहे.

 

ऑक्सफॅमच्या अहवालात काय आहे?

या अहवालात जगातील १२५ श्रीमंताच्या गुंतवणुकीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानुसार जगातील १२५ अब्जाधीशांनी केलेल्या गुंतवणुकीतून ३० लाख टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. हे उत्सर्जन ९० टक्के लोकसंख्येकडून होणाऱ्या सरासरी उत्सर्जनाच्या १० लाख पटीने जास्त आहे.
अब्जाधीशांनी केलेल्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. मात्र वैयक्तिक पातळीवर विचार करायचा झाल्यास अब्जाधीशांचा त्यांचा प्रवास, प्रवासासाठी वारण्यात येणारी वाहने यामुळेदेखील मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. २०१८ साली २० अब्जाधीशांची खासगी जहाज, खासगी विमाने, हेलिकॉप्टर्स, बंगल्यांमुळे सरासरी ८१९४ टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन झाले होते. २०२१ साली ऑक्सफॅम आमि स्टॉकहोम पर्यावरण संस्थेने संयुक्तपणे एक अभ्यास केला होता. या अभ्यासानुसार जगभरातील १ टक्के श्रीमंत लोक हे सामान्यपणे ३५ पट जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनास कारणीभूत ठरतात.
तुलना करायची झाल्यास १२५ अब्जाधीशांमधील प्रत्येक अब्जाधीशाकडून उत्सर्जित केल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची बरोबरी करायची असेल, तर साधारण १८ लाख गाईंकडून होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाची गरज भासेल. तसेच एका अब्जाधीशामुळे झालेल्या कार्बन डायऑक्साईडची भरपाई करायची असेल तर साधारण ४० लाख लोकांना शाहाकारी व्हावे लागेल.

 

कार्बन उत्सर्जन कमी न झाल्यास मानवाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल़. जगातील तीन अब्जाहून अधिक लोकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागेल, असा इशारा हवामान बदलावर काम करणाऱ्या आंतरसरकारी पॅनलने आपल्या ताज्या अहवालात दिला.

CO₂ कमी करण्यासाठी काय करावे?

कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र वेगवेगळ्या कंपन्या आणि उद्योग ते कमी करण्यात अपयशी ठरत आहेत. २०५० सालापर्यंत कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणायचे असल्यास कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम राबबावी, असा उपाय सुचवला जातोय. मात्र ही योजना तितकीशी परिणामकारक नाही. फक्त झाडे लावून २०५० पर्यंत जगातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण शून्यावर आणायचे असेल तर साधारण १.६ अब्ज हेक्टर जागेवर नवे जंगल निर्माण करावे लागेल. म्हणजे भारताच्या पाच पट जागेवर जंगल वाढवावे लागेल. याच कारणामुळे फक्त झाडे लावून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याची योजना तज्ज्ञांना व्यवहार्य वाटत नाही. CO₂ कमी करण्यासाठी प्रत्येक देशातील सरकारने सक्रियता दाखवली पाहिजे. त्यांनी पर्यावरणार पुरक असणारी धोरणे आखली पाहिजेत. तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन न होऊ देण्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. तसेच या धोरणात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे.

कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्न बदल म्हटलं की आपल्याला वाटू शकतं की जागतिक स्तरावरील नेत्यांना समोर येऊन एक धोरण आखावे आणि या समस्येवर तोडगा काढावा. पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपणही कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत करू शकतो.

 

कार्बन उत्सर्जन आपल्याला काय करता येईल?

१. जगातील एकूण कार्बन उत्सर्जनापैकी २५ टक्के उत्सर्जन हे वाहतुकीमुळं होतं. म्हणून जिथे शक्य आहे तिथं सायकल किंवा पायी चालावं.
२. उष्णता कमी करण्यासाठी घरं इन्सुलेट करावं.
३. विमानांचा वापर कमीत कमी करावा.
४. पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळायला हवा.
५. स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण करावं

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!