Just another WordPress site

चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे सांता कोण नेमके कोण? कोण होते पहिले ‘सांताक्लॉज’?

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समुदायाचा मोठा सण आहे. जगभरात जिथं जिथं ख्रिश्चन राहतात तिथं ते हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या सणाशी अनेक परंपरा निगडित आहेत, ज्यामुळे तो आणखी खास बनतो. अशीच एक परंपरा सांताक्लॉजची आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच बालपणी सांताक्लॉजची कहाणी सांगितली गेली असेल. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो. त्याच्या हातात एक भली मोठी बॅग असते, ज्यामध्ये त्याने बऱ्याच भेटवस्तू ठेवलेल्या असतात. जी तो सगळ्या लहान मुलांमध्ये वाटतो. पण तुम्हाला माहित आहे की, खरा सांता कोण होता? चला तर जाणून घेऊया.

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिश्चन समुदायातील लोक प्रभु येशू ख्रिस्ताचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. मुले देखील ख्रिसमसची आतुरतेने वाट पाहतात, कारण या दिवशी सांताक्लॉज त्यांना भेटवस्तू देण्यासाठी येतात. सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू आणि टोप्या देतात हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र, सांताक्लॉज विषयी फारशी माहिती कुणाला नाहीये. संत निकोलस हे पहिले सांताक्लॉज मानले जातात. संत निकोलसचा यांचा जन्म तिसर्‍या शतकात येशुंच्या मृत्युनंतर २८० वर्षांनंतर मायरा येथे झाला. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात. ते लहान असतानाचा त्यांच्या आई-वडिलांचे निधन झालं होतं. लहानपणापासूनच त्यांची प्रभू येशुंवर नितांत श्रद्धा होती. आणि त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला होता. निकोलस मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी आणि नंतर बिशप बनले. गरजूंना आणि लहान मुलांना गिफ्ट देण्याची त्यांना आवड होती. ते लहान मुलांना आणि गरिबांना नेहमी गिफ्ट देत होते. निकोलस हे मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करायचे. निकोलस हे सर्व गिफ्ट मध्यरात्रीच देत होते, कारण गिफ्ट देताना कोणी आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतःची ओळख ते कोणासमोरही आणू इच्छित नव्हते. संत निकोलस आणि येशूच्या जन्माचा थेट संबंध नसला तरी सांताक्लॉज हा आजच्या काळात ख्रिसमसचा एक महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक काळातील सांता १९३० साली अस्तित्वात आला. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका साकारली होती. जवळपास ३५ वर्ष तो सांता म्हणून टीव्हीवर झळकला होता. लाल कपड्यांमध्ये पांढरी दाढी असलेल्या सांताचे हे नवीन रूप मुलांना खूप आवडले. त्यानंतर सांताची क्रेझ वाढत गेली आणि तो लहान मुलांचा आवडता बनला. संत निकोलस यांच्या उदारपणाची एक अतिशय प्रसिद्ध कहाणी म्हणजे त्यांनी एका गरीब माणसाला मदत केली होती. ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यास पैसे नव्हते. तो माणूस आपल्या मुलींना जबरदस्तीने मजुरी आणि देह विक्री व्यापारात ढकलत होता. त्यावेळी, संत निकोलस त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी रात्री त्याच्या घराच्या छतावरील चिमणीजवळ पोहोचले आणि तेथे पैशांनी भरलेली पिशवी ठेवली. याठिकाणी गरीब व्यक्तीने त्याचे मोजे वाळवण्यासाठी ठेवले होते. ज्यावेळी गरीब व्यक्ती मोजे घेण्यासाठी छतावर पोहोचली त्यावेळी त्याला मोज्यांमध्ये त्याला भरपूर पैसे ठेवलेले दिसले. अशा पध्दतीनं सांताने त्या व्यक्तीची मदत केली होती. तेव्हापासून, ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू मिळण्याच्या आशेने लहान मुले घराबाहेर किंवा खिडकीत मोजे टांगतात. सांताक्लॉज फक्त लाल कपडेच घालतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याचं कारण म्हणजे लाल रंग हा आनंद आणि प्रेमाचं प्रतीक आहे. त्यातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी दिसून येते. प्रभु येशूने प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं आणि त्यांना मानवतेसाठी समर्पित होण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच सांता नेहमी लाल कपडे घालतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!