Just another WordPress site

सगळ्यांत जास्त सोनं कुठे आहे? सोन्याचे भाव ठरतात तरी कसे? सोन्याविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

भारतासहीत जगभरातील देशांमध्ये सोन्याचं विशेष महत्व आहे. नुसतं सोनं म्हटलं तरी अनेकांचे डोळे चकाकतात. लग्न आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदीकडे लोकांचा कल असतो. सणासुदीला मोठ्या संख्येने लोक सोने खरेदी खरेदीला पसंत करतात. सणासुदीचे आगमन होताच सराफा दुकानांत ग्राहकांची लगबग वाढू लागते. दसरा असो, धनत्रयोदशी असो वा अक्षय्य तृतीया हे सण हे सोन्याशिवाय, अपूर्ण आहेत. काळ बदलला असला तरीही सोन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. याच निमित्ताने सोन्याविषयी आज काही गोष्टी जाणून घेऊ.

सगळ्यांत जास्त सोनं कुठे?

जगात सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळतं. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. विटवॉटर्सरँड खोऱ्यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. तर सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण भारतात आहे, जी दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे. २००३ पासून कोलारमधील ही खाण जरी बंद असली तरी सोन्याच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारतापाठोपाठ उत्तर अमेरिकेमध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खाणींत बरंच सोनं सापडतं.

सोन्याची किंमत कशी ठरते?

सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. ‘लंडन बुलियन मार्केट’मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते. लंडन वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि दुपारी ३ वाजता ही किंमत ठरवली जाते. या पद्धतीला ‘लंडन गोल्ड फिक्स’ म्हणतात. अशा पद्धतीने ठरवलेल्या सोन्याच्या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे.

सोन्याची महाग कोणत्या कारणाने होतं?

सोन्याचे मूल्य हे जवळजवळ स्थिर आणि चलनाच्या तुलनेत अधिक असते. याचा वापर कठीण काळात महागाईपासून वाचण्यासाठी केला जातो. म्हणूनच बहुसंख्य गुंतवणूकदरांचा चलनाऐवजी सोने खरेदीकडे कल अधिक असतो. याचाच परिणाम असा की जेव्हा महागाई वाढते, तेव्हा सोन्याची मागणीही वाढते. अशा परिस्थितीत सोन्याची किंमत वाढते आणि त्याची मागणीही. शिवाय, शांततापूर्ण काळाच्या तुलनेत राजकीय अराजकतेच्या काळात सोन्याची मागणी आणि किंमत वाढते. महागाई, सरकारचा सोन्याचा साठा, जागतिक ट्रेंड, व्याजदर आणि दागिन्यांची बाजारपेठ सोन्याची किंमत ठरवते.

भारतात सर्वांत जास्त सोनं कुठे सापडतं?

भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत – कर्नाटकाच्या हुट्टी आणि उतीमध्ये आणि झारखंडच्या हिराबुद्दिनी इथं. गेल्या काही वर्षांपासून या तीनही खाणींमधलं उत्खनन कमी झालं आहे. त्यामुळे भारताला आता सोनं आयातीवर अवलंबून राहावं लागतं.

भारतात सर्वांत जास्त सोनं कुठे साठवलं आहे?

भारतात सर्वांत जास्त सोनं मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती धन आहे, याचा नेमका अंदाज अजून कोणालाच नाही. पण २०११ मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती, भांडी, दागिने, नाणी आणि मौल्यवान रत्नं सापडली. त्याची किंमत जवऴपास १०० अब्ज आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिरामधल्या सोन्याचा साठा सर्वश्रूत आहे. तर यंदा तिरुपती बालाजी देवस्थाने प्रशासनाने आपली मालमत्ता जाहीर केली आहे. त्यात त्यांनी १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे असल्याचं सांगितलं.

सरकारने कुठं दडवून ठेवलं आहे सोनं?

सरकारकडून सर्वांत जास्त सोनं बँकांच्या लॉकर्समध्ये साठवलं जातं. आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल ६०० अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे. आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे.

सोन्याची मोठी बाजारपेठ कोणती?

भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सर्वांत जास्त दागिने विकले जातात. तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीनं भारतात सोनं विकलं जातं.

अर्थव्यवस्थेसाठी सोनं इतकं महत्त्वाचं का?

सोने हे देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आहे की नाही याचे निर्देशक सूचक आहे. ज्या देशामध्ये सोन्याची किंमत जास्त असते, तेथील अर्थव्यवस्था कमकुवत असते. याउलट ज्या देशात ही किंमत कमी असते, त्याची अर्थव्यवस्था बळकट असते.

सोनं खरं की खोटं कसं ओळखायचं?

जेव्हा तुम्ही बाजारात सोने खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा दागिन्यांवर नेहमी हॉलमार्क चिन्ह असावे याची विशेष काळजी घ्या. कधीकधी स्थानिक ज्वेलर्स हॉलमार्कशिवाय दागिने विकतात. अशा परिस्थितीत हॉलमार्क केलेले सोने विकणाऱ्या दागिन्यांच्या दुकानातूनच सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करा. पाण्याच्या मदतीने तुम्ही खरे आणि खोटे सोने सहज ओळखू शकता. पाण्यात टाकल्यावर खरे सोने लगेच बुडते. तर खोटे सोने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. याशिवाय, तुम्ही चुंबकाच्या सहाय्यानेही सोने ओळखू शकता. चुंबक खऱ्या सोन्याला चिकटत नाही. परंतु खोट्या सोन्यावर चिकटू शकते. सोन्यामध्ये चुंबकीय धातू मिसळण्यात आल्यास चिकटते. त्यामुळे खोटं सोनं ओळखण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!