Just another WordPress site

ऑनलाइन खरेदी करतांना फसवणूक झाल्यास काय करावं? कुठं आणि कशी तक्रार करावी?

अलीकडे Amazon, Flipkart यासारख्या ई-कॉमर्स साईट्सवरून घरबसल्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला. मात्र, अनेकदा ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या जागी दुसरंच कुठलंतरी प्रोडक्ट आढळून आल्यांचे प्रकार उघडकीस आले. तुम्ही डिलिव्हरी बॉक्समध्ये बटाटे आढळून आल्याच्या बातम्या पेपरात वाचल्याच असतील. दरम्यान, अशी वेळी तक्रार कुठं करावी? याच विषयी जाणून घेऊ.

सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि भरघोस डाटा असतो. ई कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या ऑफर यामुळे ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड वाढला. जीवनावश्यक वस्तूंपासून, फर्निचर, मोबाइल, कपडे अशा अनेक वस्तूंची खरेदी ऑनलाइन केली जाते. मात्र, अनेकदा ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना फसवणुकीला तोंड द्यावे लागते. आजवर फसवणूकीच्या अनेक घटना समोर आल्या. आजच्या ग्लोबल असलेल्या बाजारपेठेत ग्राहकाला कस्टमर इज किंग अशी विशेषणं लावली जातात. अन् दुसरीकडे त्याच ग्राहकाला बळीचा बकरा बनवून त्याची लूट केली जाते. खरंतर या फसवणुकीच्या घटनांसाठी विक्रेता, शिपिंग कंपनी जबाबदार असते. मात्र, यात नुकसानं होतं ते ग्राहकांचं. दरम्यान, फसवणूक झालेली व्यक्ती रिफंडसाठी प्रयत्न करु शकते. मात्र हा रिफंड मिळवण्यासाठी तात्काळ तक्रार करणं आवश्यक आहे.

फसवणूक झाल्यास कायदा काय सांगतो?

भारत सरकारच्या ग्राहक विभागानं ई-कॉमर्स साईवरून खरेदी करतांना काही फसवूक होऊ नये यासाठी काही काही नियम केले. त्यानुसार, ग्राहकाला ई-कॉमर्स वेबसाइटशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करायची असेल तर तो ते सहजपणे करू शकतो. हा ग्राहकाचा हक्क आहे. नियमांनुसार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारीला ४८ तासांच्या आत उत्तर द्यावं लागतं. ग्राहकाची तक्रार आल्यानंतर कंपनीला एक महिन्याच्या आत त्या तक्रारीचं निवारण करणंही बंधनकारक आहे.

फसवणुकीची तक्रार कशी करावी?

सर्वप्रथम तुम्हाला ई-कॉमर्स साइट किंवा विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. मात्र, निर्धारित वेळेत तुमची समस्या दूर झाली नाही, तर तुम्ही पुढे तक्रार करू शकता. मात्र, जर तुम्ही बनावट किंवा बोगस साइटवरून खरेदी केली असेल तर पैसे मिळणे जवळजवळ अशक्य होते. ई-कॉमर्स वेबसाइटची निवारण यंत्रणा काम करत नसेल तर कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर तक्रार करण्यास अजिबात संकोच करू नका. याशिवाय, सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM अर्थात Integrated Grievance Redressal Mechanism वर तक्रार दाखल करा. consumerhelpline.gov.in या ग्राहक व्यवहार साइटवरही तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता. याशिवाय, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहक न्यायालयांनी ग्राहकांच्या हिताचे जलद निर्णय दिले असून निष्काळजीपणासाठी कंपन्यांना दंडही ठोठावला.

दरम्यान, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाजारात सध्या असलेल्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करणं. याचा फायदा असा होईल की तुम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!