Just another WordPress site

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाचं ‘हे’ असू शकते निवडणूक चिन्ह

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते राजकीय दसरा मेळाव्याकडे. यंदा सेनेचे एक नाही तर दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिववतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा तर BKC मध्ये शिंदे गट दसरा मेळावा घेणार आहे. दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाच्या एका तलवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी ५१ फुटी तलवार ठेवण्यात आली. त्यामुळे यापुढे शिंदे गट आपले चिन्हं तलवार किंवा ढाल-तलवार ठेवेल असे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत एकत्र सत्तेत येत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिला तो म्हणजे थेट पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा ठोकला. आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं, अशी उद्धव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती. ती मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. दरम्यान, धनुष्यबाणाविषयी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यामुळं निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याची अनेकांना उत्सुकता लागली. दरम्यान, निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळं ठाकरे किंवा शिंदे यापैकी कोणालाही धनुष्यबाण मिळणार नाही.

अशातच दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवसैनिक हे चातकासारखी वाट पाहत असतात . त्यामध्ये शिवसेनेत यंदा मोठी फूट पडली आहे आणि दोन दसरा मेळावे होत आहेत. यामध्ये शिंदे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण शिवसेनेत ४० आमदारांच्या बंडा नंतर मोठ्या प्रमाणात असंतोष हा शिवसैनिकांमध्ये देखील आहे आणि ते माझ्या पाठीशी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असणार आहे. शिवसेनेतून फूटल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने मोठी योजना तयार केली. या मेळाव्यात ५१ फुटी तलवारीचं पूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात तलवारीचं शस्त्रपूजन होईल. यातून शिंदे गट पुढे आपली निशाणी तलवार किंवा ढाल तलवार ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. दसऱ्याला शस्त्राचे पूजन केले जाते , त्यामुळे आगामी वाटचालीसाठी शिंदे आपल्या गटासाठी या तलवारीची पूजा करून हे शस्त्र निशाणी म्हणून पुढे आणण्याची शक्यता अधिक आहे. तसेच शिंदे यांना अन्य नेते मंडळी चांदीची तलवार देखील भेट देणार आहेत अशी माहिती मिळतेय. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाची निशाणी तलवार असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

खरंतर शिवसेनेची स्थापना १९६६ रोजी झाली. मात्र स्थापनेवेळी शिवसेना ही फक्त एक संघटना होती आणि राजकीय पक्ष म्हणून तिची नोंद केली गेली नव्हती. मात्र नोंद होण्यापूर्वी अनेक निवडणुका लढवताना शिवसेनेनं इतर वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या होत्या. त्यात कप बशी, ढाल तलवार, इंजिन अशी काही चिन्ह वापरण्यात आली होती. त्याचाच संदर्भ घेऊन पुढे शिवसेनेतील शिंदे गट तलवार किंवा ढाल तलवार हे चिन्ह घेऊ शकतात असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं औसुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!