Just another WordPress site

शिंदे गटाने दावा ठोकलेल्या धनुष्यबाण या चिन्हाचा इतिहास तरी काय? धनुष्यबाण हे चिन्ह सेनेला कधी मिळालं?

एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर त्यांनी आता शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच दावा ठोकला. धनुष्यबाण वादाचा चेंडू सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या दारात गेला. त्यामुळं धनुष्यबाणाविषयी निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, धनुष्यबाण कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली. याच निमित्ताने धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला त्याविषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. शिंदे गटाने केला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच दावा
२. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण गोठवण्याची शक्यता
३. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह सुरूवातीपासून सेनेसोबत नव्हतं
४. १९८९ साली शिवसेनेला मिळालं होतं धनुष्यबाण हे चिन्ह

 

शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर उध्दव ठाकरेंची लढाई आता आपलं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं वाचवण्यासाठी सुरु आहे. कारण बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणा वर दावा सांगण्यास सुरुवात केली. धनुष्यबाण या चिन्हाविषयी आता निवडणूक काय निर्णय घेते, याची अनेकांना उत्सुकता लागली. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनाला कसं मिळालं? हे जाणून घ्यायचं असेल तर शिवसेनाच्या इतिहासात डोकवावं लागेल. शिवसेनेची स्थापना झाली ती १९६६ साली. मुंबईत होणारा मराठी माणसावरचा अन्याय आणि अत्याचार या विरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. संघटना म्हणून शिवसेनेने अनेक आंदोलनं केल्यानं अल्पावधीत शिवसेनेचा नावलौकिक झाला. यानंतर पुढच्याच वर्षी शिवसेनेने राजकारणात उडी घेतली. मात्र शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुरूवातीपासून शिवसेनेसोबत नव्हतं.

१९६८ मध्ये जेव्हा शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती झाली तेव्हा झाली तेव्हा १४० जणांच्या सभागृहात शिवसेनेने ४२ जागा जिंकल्या. त्यानंतर १९७२ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई गट आणि मुस्लीम लिग यांच्याशी युती केली. ही युतीही महापालिका निवडणुकीपुरतीच होती. १९७६ ते १९७८ या कालावधीत काँग्रेस आणि शिवसेनेची महापालिकेत युती होती. १९८० मध्ये शिवसेनेने काँग्रेसची साथ महापालिकेत सोडली. मात्र तोपर्यंत शिवसेनेने रेल्वे इंजिन, कप बशी, ढाल तलवार अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या होत्या.

आता प्रश्न उरतो तो धनुष्यबाण शिवसेनेला कधी मिळाला तरी कधी? तर धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. महत्वाचं म्हणजे, सध्या हिंदुत्व, भगवा आणि धनुष्यबाणाचा ज्याप्रमाणे वेगळा न करता येणारा संबंध तयार झालाय त्यावरून अनेकांना विश्वास बसणार नाही, मात्र, धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेने मागणी करून घेतलं नव्हतं, तर ते निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलं होतं. १९८८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला. सोबतच स्वतःची घटनाही तयार केली. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. मात्र मतदानाची आवश्यक टक्केवारी नसल्यामुळे त्यांना चिन्ह मिळू शकलं नव्हतं.

पुढं १९८९ मध्ये शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढवली. यासाठी शिवसेना-भाजपची युती झाली होती. त्यावेळी परभणीतून शिवसेनेचे उमेदवार म्हणून अशोकराव देशमुख रिंगणात उतरले होते. त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. देशमुखांसह शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने शिवसेनेला मागणीप्रमाणे धनुष्यबाण मिळाले होते. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवत आहे.

धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं शस्त्र असल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक चिन्ह उत्साहाने स्वीकारलं होतं. आता या चिन्हाचं नेमकं काय होणार? हा निवडणूक आयोग नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!