Just another WordPress site

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय? या नंबर प्लेटचा काय फायदा होतो? या नंबर प्लेटसाठी खर्च किती येतो?

वाहतूक गुन्हे केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहन क्रमांकांच्या नंबर प्लेटमध्ये अनकेदा बदल केला जातो. नंबर प्लेट बदलल्यामुळे वाहनं सापडत नाहीत. त्यामुळं वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलीये. ही नंबर प्लेट खरंतर २०१९ पासून नव्याने उत्पादित होणाऱ्या गाड्यांसाठी अनिवार्य करण्यात आलीये. पण, आता जुन्या गाड्यांवरही ही नंबर प्लेट केंद्राने अनिवार्य केलीये आणि लवकरच महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय? या नंबर प्लेट सुविधेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय?

वाहनाची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट तयार करण्यात आलीये. या प्लेट्स अ‍ॅल्युमिनीयम मिश्र धातुपासून बनवलेल्या असतात. या प्लेटवर HSRP होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचा इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असतो. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो. याशिवाय या प्लेट्सवर एक बारकोडही असतो. हा बारकोड प्रत्येक गाडीला वेगवेगळा असतो. हा बारकोड स्कॅन केल्यावर पोलिसांना गाडीबद्दलची सगळी माहिती मिळते. येवढंच नाही तर, या प्लेटवर एक चीप आणि गोपनीय नंबरही असतो. ही प्लेट गाडीवर बसवली की, लगेच हा नंबर दोन्ही बाजूने लॉक होतो. मग, कुणीही ते लॉक उघडू शकत नाही. वाहन चोरीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये या नंबर प्लेट्स अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्येही सहजासहजी बदल करता येत नाही.

या प्लेटमुळं सुरक्षा कशी मिळते?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या नंबर प्लेटमुळे हाय सिक्‍युरिटी कशी मिळते? तर त्याचं उत्तर या नंबर प्लेटच्या फीचर्समध्ये आहे. तुम्हाला ठाऊक आहे की, उच्च तंत्रज्ञान वापरून या नंबर प्लेटवर युनिक बारकोड, इलेक्ट्रॉनिक चिप तसेच सेन्सर असते. त्यात वाहनधारकांची सगळी माहिती असते. त्याचा गैरवापर होत असेल, तर बारकोड आणि सेन्सरमुळे संबंधित प्रशासनाला त्याची माहिती लगेच मिळण्यास मदत होते. थोडक्यात काय तर वाहन चोरी होणं, वाहन अपघात आणि गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ महत्त्वाची ठरते. याशिवाय, एखाद्या चोरानं वाहनाची नंबरप्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाइलवर मिळतो.

केंद्र सरकारने देशभरात १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना ही नंबरप्लेट लावणं बंधनकारक केलं. पण, आता जुन्या गाड्यांवरही ही नंबर प्लेट केंद्राने अनिवार्य केलीये . मात्र, महाराष्ट्रात जुन्या वाहनांना हा नियम अदयाप लागू करण्यात आला नसून त्यावर विचार विनिमय सुरू आहे.

जुन्या वाहनांसाठी काय नियमावली?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बसवण्याचा निर्णय घेतला होता. या पाट्या नेमक्या कशा असाव्यात. त्यावर काय माहिती असावी, पाटीचा आकार कसा असावा, याबाबतचे सर्व निकषही ठरवण्यात आले. नव्या वाहनांना उत्पादकांनी किंवा वितरकांनी या पाट्या बसवून देणं बंधनकारक करण्यात आलं आणि १ एप्रिल २०१९पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. टू व्हीलर आणि फोर व्हीलर अश्या दोन्ही प्रकारच्या वाहनांना या प्लेट्स लावणं अनिवार्य केलंय. याशिवाय तुमची गाडी पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांपैकी कोणत्या इंधनावर चालते हे दाखवणारे कलर कोडेड स्टीकर्स लावणंही अनिवार्य असेल. या नियमांचं उल्लंघन केलं तर, पाच हजार ते दहा हजार इतका दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

अर्ज कसा करायचा?

तुम्हाला हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट हवी असेल तर शासनाच्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळावर जावं लागेल. तिथं वाहन क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन प्रकार ही सगळी माहिती भरावी लागणार आहे. वाहन खासगी वापरासाठी असल्यास ‘नॉन-ट्रान्सपोर्ट’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर वाहनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर शुल्क भरण्यासाठी दिलेले वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावं लागेल. शुल्क भरल्यानंतर शुल्क भरल्याची पावती मिळेल. नंतर हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट तयार होताच, वाहनधारकाला मोबाइल क्रमांकवार त्याबद्दची नोटिफिकेशन मिळेल.

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेटसाठी खर्च किती?

हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट हवी असल्यास त्यासाठी वाहनधारकाला थोडा खर्च सोसावा लागेल. त्यासाठी दुचाकींसाठी ४०० रुपये ते चारचाकी वाहनांसाठी ११०० रुपये किंमत निश्चित करण्यात आलीये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!