Just another WordPress site

सर्जा-राजाची जोडी पुन्हा उधळणार, बैलगाडी शर्यतीला सप्रीम कोर्टाची परवानगी

Supreme Court gives permission to bullock cart race : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या बैलगाडा आणि जल्लीकट्टू खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, (Bullock cart race) तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना (Kambala game) परवानगी दिली आहे.

अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे.
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू आणि कर्नाटकमध्ये कम्बाला या खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

दरम्यान, न्यायालयाने यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारांचा अधिकार यावेळी मान्य केला. ‘तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू गेल्या शतकाहून अधिक काळापासून चालू आहे. हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. जर विधिमंडळाने असे ठरवले असेल की जल्लीकट्टू तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे, तर न्यायव्यवस्था त्याहून वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधिमंडळाला आहे. हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांनाही लागू होते’, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!