Just another WordPress site

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक : मुंडे भावंड एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Vaidyanath factory election Munde sister-brother will unite : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. कधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे वारसदार म्हणून तर कधी राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. पंकजा मुंडे बंधू आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी एकदाही सोडली नाही. काहीवेळा टोकाला गेलेला एकमेकांतील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दोघांनी जाहीरपणे समेटाची भूमिका घेतली होती. यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यात जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे बिनविरोध आले आहेत. तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आहे. यातून हा समन्वय दिसून येत आहे. आता आगामी काळात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र येणार असल्याची शक्यता बोलल्या जाते. कारण, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

हे ही वाचा : शेतकऱ्यांना सुगीचे दिवस! तुरीच्या दरात १ हजार १०५ रुपयांची वाढ; तुर १२ हजारांचा पल्ला गाठणार?

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्जच भरलेला नाही. तर पंकजा मुंडे यांनी आपल्या स्वत:सह आई आणि दोन्ही बहिणींचा अर्ज दाखल केला आहे.

तर धनंजय मुंडे यांच्याकडून अजय मुंडे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भावात चुरस पाहायला मिळेल, असं चित्र वर्तवले जात असले तरी संघर्ष टाळून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोघांनीही प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

नाथरा या छोट्याशा गावातून गोपीनाथराव मुंडे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ती संपूर्ण महाराष्ट्र व शेवटी राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या संघटनेत व केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदापर्यंत जाऊन पोचली. याच काळात कुटुंबातील वारसा हक्काचा मुद्दा पुढे आला. यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा कल मोठी मुलगी पंकजा मुंडे यांच्याकडे होता. याच काळात गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांचे सुपुत्र धनंजय मुंडे यांचीही राजकीय वाटचाल सुरू झाली होती. सर्वांना असे वाटत होते की, गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय वारस हे धनंजय मुंडे आहेत.

हे ही वाचा : सर्जा-राजाची जोडी पुन्हा उधळणार, बैलगाडी शर्यतीला सप्रीम कोर्टाची परवानगी

दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून 1 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 जून रोजी मतदान होणार असून 12 जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र कारखाना निवडणुकीत स्वत: किंवा कुटुंबातील एकाही व्यक्तीचा अर्ज दाखल केलेला नाही. केवळ अजय मुंडे यांचा त्यांच्या गटातून परिवारीतील उमेदवारी अर्ज आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत 1 जून असल्याने या काळात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंडे-बहिण भाऊ या निवडणुकीत एकत्र येणार का आणि ही निवडणुक बिनविरोध होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!