Just another WordPress site

टिकली प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या संभाजी भिडेंच्या पाया पडल्या सुधा मूर्ती, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून टीका

सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केल्यानं ते पुन्हा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आणि त्यांच्यावर टीकाही झाली. अशातच दुसरीकडे इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंची भेट घेतली.

गेल्या आठवड्यात टिकलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भिडे गुरुजी चर्चेत आहेत. संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन असं उत्तर दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यावर राज्य महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना नोटीसही पाठवली. त्यावरून सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या काल कोल्हापूर आणि सांगली इथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी कुरुंदवाडमधील त्यांच्या घरी भेट दिली. सुधा मूर्ती यांच्या या भेटीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर जगभरात सुधा मूर्ती यांची चर्चा झाली होती. कारण सुधा मूर्ती या ऋषी सुनक यांच्या सासूबाई आहेत. मात्र, आता सुधा मुर्ती यांची ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे त्यांनी या संभाजी भिडे यांची भेट घेतली.

एका कार्यक्रमादरम्यान सुधा मूर्ती या सांगलीतल्या भावे नाट्यगृहात आल्या होत्या. त्यावेळी तिथे संभाजी भिडेही आले होते. नाट्यगृहाच्या आवारातच या दोघांची भेट झाली. त्यावेळी या दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. तिथे सुधा मुर्ती या भिडे गुरुजींच्या वाकून पायाही पडल्या. संभाजी भिडे यांच्या पाया पडल्याचा सुधा मूर्तींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सुधा मूर्ती मराठमोळ्या पेहरावात दिसल्या. त्यांनी साडी, नथ, तसंच केसांत गजराही माळला होता.

दरम्यान, मागच्या आठवड्यात संभाजी भिडे मंत्रालयात आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो, आम्ही प्रत्येक स्त्रीमध्ये भारतमातेचं रूप पाहतो आणि भारतमाता विधवा नाही ’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
त्यामुळे भिडे यांनी महिला पत्रकाराचा अपमान केल्यावरुन वाद निर्माण झाला. हा वाद अजूनही ताजाच आहे. अशातच सुधा मूर्तींनी संभाजी भिडे यांची भेट घेतली. एवढंच नाही तर सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंना वाकून नमस्कारही केला. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय. तर सोशल मीडियावर काही युजर्सकडून सुधा मूर्ती यांच्यावर टीकाही होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!