Just another WordPress site

‘हर हर महादेव’च्या वादानंतर अभिजीत देशपांडेंनी मांडली भूमिका; म्हणाले, ‘महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी…’

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. पहिल्या दिवशी तब्बल २ कोटी २५ लाख रुपये इतपत कमाई चित्रपटाने केली. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला.

 

महत्वाच्या बाबी

१. ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन मोठा वाद
२. ठिकठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडले जातात
३. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी…’
४. देशपांडे यांची पत्रकार परिषदेतील भूमिका

 

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित हर हर महादेव या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘हर हर महादेव’ आणि अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटांना आव्हाड यांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषद घेत इतिहिसाची मोडतोड करुन दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना विरोध केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या विरोधानंतर सोमवारी आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसहीत थेट चित्रपटगृहातील हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. राज्यात ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान,
यासगळ्या प्रकरणावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे. चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले गेले. अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. हा घडलेला प्रकार अत्यंत लांच्छनास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे अभिजित देशपांडे म्हणाले, ‘तुम्ही एखाद्या चित्रपटगृहात जाऊन तेथील लोकांना मारता हे किती चुकीचं आहे? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात. यासाठी या सर्व लोकांनी महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी.’

‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका साकरली असून शरद केळकर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आहे. मराठीसह तेलुगु, तमिळ, कन्नड, हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!