Just another WordPress site

Pola | आला सण पोळ्याचा; सण एक दिन, बाकी वर्षभर, ओझे मरमर… ओढायचे..!

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो, आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणार्‍या पोळा या सणानं. हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजीवांना देखील पुजनीय मानल्या जातं. वर्षभर शेतात शेतकर्‍यांच्या बरोबरीने राबणार्‍या बैलांप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो. श्रावण अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा  हा सण अत्यंत आनंदाने साजरा करतात.


हाईलाईट्स

– बैलाच्या दातृत्वातून उतराई होण्यासाठी पोळा

– पोळ्याच्या दिवशी बैलांना कामावरून आराम 

– शेतकऱ्यांनो, आपल्या बैलांची शिंगे साळू नका

– बैलांना नायलॉन दोरीची वेसण घालू नकाग्रामीण भागात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर शेतात शेतकऱ्यासोबत राबराब राबून मोती पिकविणाऱ्या बैलाला पुरणपोळी घालण्याचा हा एकच दिवस असतो. या दिवशी शेतकरी बैलांना खाउपिऊ घालतात. पोटभर चारा सोडून इतर कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या धन्यासाठी राबराब राबणाऱ्या बैलाच्या दातृत्वातून उतराई होण्यासाठीच पोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात. आज आवतन घ्या उद्या जेवायला या! असं आमंत्रण या बैलांना पोळ्याच्या आदल्या दिवशी दिलं जातं. पोळ्याचा दिवस उगवला की बैलांना कामावरून आराम मिळतो. या दिवशी बैलांना नदीवर नेलं जातं. शेतकरी आपल्या बैलांना अंघोळ घालतात. अगदी साबण-शांपू लावून बैलांना चकाचक केलं जातं. गेल्या वर्षी शिंगांना लावलेला हिंगूळ आता अस्पष्ट झालेला असतो. तो काढण्यासाठी त्यावर नवीन रंग बसावा म्हणून शिंगे साळली जातात. दुपार नंतर नदीवरून बैलजोड्या गावाकडे निघायला सुरुवात होते. बैलांना नदीवरून घरी आणल्यावर  बैलांना साजशृंगार चढवतात. शिंगांना हिंगूळ लावण्यात येतो. बैलाच्या डोक्याला बाशिंग, रंगीबेरंगी गोंडे,  गळयात कवडया आणि  खण-खण आवाज करणाऱ्या घुंगरांच्या माळा आणि गळ्यात किणकिणणाऱ्या पितळी घंट्या घातल्या जातात. पायांमधे तोडे घालतात.  नव्या-कोऱ्या वेसणी, मऊसूत कासरा घातला जातो. नवी वेसण, नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. कुणी बैलाच्या अंगावर त्याचं नाव लिहितं तर कोणी काही संदेश लिहितं. 

मग वाजंत्री सुरू होतात. शेतकरी  मारुतीच्या मंदिरात बैलांना नेतात. बैल म्हणजे नंदी आणि मारुती हा शंकराचा अवतार मानला जातो. त्यामुळे मारुतीच्या मंदिरात दर्शन ही पिढ्यान् पिढ्या चालत आलेली रीत. मारूतीच्या पारापुढे बांधलेल्या तोरणाजवळ शेतकरी आपले बैल घेऊन येतात.  बैलजोडी मंदिरासमोर नतमस्तक होतात. मंदिरात नारळ फोडला जातो, उदबत्त्या लावून, पंचपक्वान्नांचा नैवेद्य ठेवला जातो. बैलजोडी मंदिराला प्रदक्षिणा मारते आणि मग पोळा फुटतो. बैलजोड्या  उधळत सुसाट पळत सुटतो. त्यांच्या मागे पळताना मालकाची धांदल उडते. सगळीकडे घुंगरांचा, घंट्यांचा आवाज येतो. मग दमून-भागून घरी आलेल्या बैलजोडीचं मालकीन मोठ्या उत्साहात आणि प्रेमानं स्वागत करते. 

बैलाची पुजा केली जाते. इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो, असं म्हणत सुवासिनी दोन्ही हात तोंडावर फिरवून वाईटाच्या नावानं कडाकडा बोटं मोडतात. त्यानंतर मालकीन बैलांना पुरणपोळीचा घास भरवते.  हा नैवेद्य खाऊन बैलही धन्य होतात. त्यांच्यात नवी उभारी येते, पुन्हा वर्षभर मालकाची चाकरी करण्याची. एका कवीनं राबराब राबणाऱ्या बैलाच्या आयुष्याची व्यथा आपल्या कवितेत अधोरेखीत केली. कवी म्हणतो- 


शिंगे रंगवली/ बासिंगे बांधीले

चढवल्या झुली ऐनदार…


राजा परधान/ रतन दिवान 

वजीर पठान / तुस्त मस्त…


वाजंत्री वाजता/ लेझीम खेळती

मिरवत नेती / बैलालागी…


डुलु डुलतात/ कुणाची व शिंगे

काही बोंड खोंड/ अवखळ…


कुणाच्या शिंगाना/ बांधीयले गोंडे

हिरवे तांबडे/ शोभिवंत…


झुलीच्या खालती/ काय नसतील

आसुडाचे वळ/ उठलेले…


आणि फुटतील/ उद्याही कडाड

ऐसेच आसुड/ पाठीवर…


सन एक दिन/ बाकी वर्षभर

ओझे मरमर / ओढायचे..!

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!