Just another WordPress site

आता होणार CWC ची निवडणूक, काय आहे CWC समिती? यातील सदस्यांची निवड कोण करते?

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच सीडब्ल्यूसीची निवडणुकही जाहीर झाली. काँग्रेस कार्यकारिणीची समितीची निवडणूक ७५ वर्षांत तिसऱ्यांदा आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वातील २४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच होणार आहे. याच निमित्ताने CWC म्हणजे काय? या समितीतील सदस्यांची निवड कोण करते? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. ७५ वर्षांत तिसऱ्यांदा होणार CWC निवडणूक
२. डिसेंबर १९२० मध्ये झाली होती CWC ची स्थापना
३. CWC काँग्रेस अध्यक्षपदाची निवड जाहीर करते
४. CWC ला आहे पक्षाच्या घटनेच्या अंमलबजावणीचा अधिकार

 

काँग्रेसच्या सद्यस्थितीवर पक्षाच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या G २३ नेही सीडब्ल्यूसीच्या १२ जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. आझाद यांच्या बंडखोरीनंतर कपिल सिब्बल आणि अश्विनी कुमार यांच्यासारख्या नेत्यांच्या दबावानंतर काँग्रेसला सीडब्ल्यूसीच्या निवडणुका घेणं गरजेंच मानल्या जातंय.

 

काँग्रेस कार्यकारणी समिती म्हणजे काय?

काँग्रेस कार्यकारणी समिती जाणून घेण्याआधी, कॉंग्रेसची संघटना जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. काँग्रेसचे संघटनेचे ५ स्थर आहेत. त्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, काँग्रेस कार्यकारिणी, प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ब्लॉक कमिटी. यात कार्यकारी समिती म्हणजेच CWC ही सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. CWC चा इतिहास पाहायला गेलं तर हि कार्यकारणी समिती काँग्रेसच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात आहे. डिसेंबर १९२० मध्ये काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात त्याची स्थापना झाली. त्यानंतर या कमिटीचा काँग्रेसच्या विस्तारामध्ये मोठा रोल होता. पक्षाच्या घटनेतील तरतुदींचा अर्थ लावण्याचा आणि अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार सीडब्ल्यूसीकडे आहे. एकदा का या समितीने निर्णय घेतला तर तो पक्षाला आणि सदस्यांसाठी अंतिम निर्णय असतो. काँग्रेसच्या घटनेनुसार, सीडब्ल्यूसीमध्ये पक्षाध्यक्ष, त्यांचा संसदेतील नेता आणि २३ इतर सदस्य असतात, ज्यापैकी १२ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे निवडले जातात आणि उर्वरीत नियुक्ती पक्षाध्यक्षाडून केली जाते. हि कमिटी पक्षाचे धोरण ठरवण्यास मदतीची ठरते.

 

CWC काँग्रेस अध्यक्षपदाची निवड जाहीर करते का?

तर याचं उत्तर हो असं आहे. CWC काँग्रेस अध्यक्षपदाची निवड जाहीर करते. CWC निवडणूक आयोजित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करते. ही निवडणूक आयोगासारखी अंतर्गत संस्था आहे. हीच संस्था निवडणुकीची तारीख, नामांकनाची तारीख, माघार घेण्याची तारीख आणि उमेदवारांची नावे जाहीर करते. या प्राधिकरणामध्ये ३ ते ५ सदस्य असतात. सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री त्याचे अध्यक्ष आहेत.

 

CWC किती शक्तिशाली आहे?

सीडब्ल्यूसीकडे वेगवेगळ्या वेळी पक्षात वेगवेगळ्या प्रकारची सत्ता होती. स्वातंत्र्यापूर्वी, CWC हे सत्तेचे केंद्र होते. तसेच काँग्रेस अध्यक्षांपेक्षा कार्याध्यक्ष अधिक सक्रिय होते. १९६७ नंतर काँग्रेसचे दोन तुकडे झाले तेव्हा सीडब्ल्यूसीची सत्ता पूर्वीसारखी राहिली नाही. १९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या विजयाने राज्यांच्या सत्तांना कमकुवत केले आणि CWC पुन्हा एकदा निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था बनली. CWC ला पक्षाध्यक्षांना हटवण्याचा आणि इतर कुणा सदस्यांना नियुक्त करण्याचा अधिकार असतो. पक्षाची घटना आणि नियमांची अंमलबजावणी करण्याचा सर्वस्वी अधिकार या कमिटीकडे असतो.

 

CWC ची मागील निवडणूक कधी झाली होती?

गेल्या ५० वर्षांत प्रत्यक्ष निवडणुका दोनदाच झाल्या आहेत. दोन्ही प्रसंगी नेहरू-गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती सत्तेत होती. १९९२ मध्ये, तिरुपती येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पूर्ण अधिवेशनात, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी.व्ही. नरसिंह राव यांनी CWC साठी निवडणूक घेतली, या आशेने की त्यांनी निवडलेले लोक जिंकतील. मात्र, त्यांचे विरोधक असलेले अर्जुन सिंग, शरद पवार आणि राजेश पायलट त्यावेळी निवडून आले होते. त्यामुळं पी.व्ही. नरसिंह राव यांनी संपूर्ण सीडब्ल्यूसीचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी कारणं दिलं की, कार्यकारणीत एकही एससी, एसटी किंवा महिला निवडून आली नाही. त्यानंतर त्यांनी CWC ची पुनर्रचना केली आणि सिंह आणि पवार यांचा नामनिर्देशित वर्गात समावेश केला. पुढं १९९७ मध्ये सीताराम केसरीच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे CWC च्या निवडणुका पुन्हा झाल्या. मतमोजणी दुसऱ्या दिवशीपर्यंत चालल्याचे पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आहे. अहमद पटेल, जितेंद्र प्रसाद, माधव राव सिंधिया, तारिक अन्वर, प्रणव मुखर्जी, आरके धवन, अर्जुन सिंग, गुलाम नबी आझाद, शरद पवार आणि कोटला विजया भास्कर रेड्डी हे विजेते होते.

 

भाजपमध्येही CWC सारखी समिती आहे का?

काँग्रेसप्रमाणेच भाजपकडे निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था आहे. त्याला संसदीय मंडळ म्हणतात. त्यात ११ सदस्यांचा समावेश आहे. हे सर्व भाजप अध्यक्ष निवडतात. २०१३ मध्येच भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!