Just another WordPress site

मुंबई, गुजरात रखडलं अन् हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक जाहीर होण्याची आशा होती. मात्र, आयोगानं केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याची घोषणा केली.

 

महत्वाच्या बाबी

१. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
२. १२ नोव्हेंबरला होणार निवडणूक, ८ डिसेंबरला मतमोजणी
३. हिमाचल प्रदेशमध्ये आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू
४. अनेक पोल्सच्या अंदाजानुसार ही निवडणूक चुरशीची होणार

 

अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचा कालावधी ८ जानेवारीला संपणार आहे. हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी २५ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. २७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल.
हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणूका एका टप्प्यात १२ नोव्हेंबरला पार पडतील. तर ८ डिसेंबर दिवशी मतमोजणी होणार असून तेव्हाच निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी आचारसंहिता आजपासून लागू होणार आहे.

सध्या राज्यात भाजपचे सरकार असून अनेक पोल्सच्या अंदाजानुसार ही निवडणूक चुरशीची होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांच्या निवडणुकांवर लागून राहिले आहे.

हिमाचल प्रदेशामध्ये ५५ लाख मतदार आहेत. पत्रकार परिषदेत आज दिलेल्या माहितीमध्ये १,१८४ मतदार शंभरी पार आहेत. दरम्यान या निवडणूकीची अधिसूचना १७ ऑक्टोबरला जारी केली जाणार आहे. ८० वर्षांवरील वृद्ध व्यक्ती, दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं आयोगानं सांगितलं.

हिमाचल प्रदेश मध्ये ६८ जागा असून ३५ हा बहुमताचा आकडा आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकांच्या वेळेस भाजपने हिमाचल प्रदेशात ४४ तर कॉंग्रेस २१ जागी विजय मिळवला होता. तर सीपीएमला १ तर इतर २ असे पक्षीय बलाबल होते. २०२१ मध्ये ३ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप हरली होती. त्यामुळे याठिकाणी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

आजच्या पत्रकारपरिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गुजरात विधानसभेचा कालावधी फेब्रुवारी २०२३ पर्यंत असल्याने वर्षअखेरीस त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा कार्यकाळात ४० दिवसांचं अंतर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामानाची स्थिती महत्त्वाची आहे. विशेषत: या राज्याच्या उत्तर भागात जिथं बर्फवृष्टी होते, म्हणून हिमाचलची निवडणूक आधी जाहीर करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!