Just another WordPress site

गावावर शोककळा! भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार, एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार

दौंड : दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर रात्रीच्या वेळी उसाच्या ट्रॉलीला दुचाकी पाठीमागून धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वारांना रस्त्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही.

गणेश बापू शिंदे (वय २५ वर्ष), ऋषिकेश महादेव मोरे (२६), स्वप्नील सतीश मनुचार्य (२४) (तिघेही राहणार जुना बाजार तळ काष्टी, तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत.

अपघातातील मयत ऋषिकेश याचे वडील महादेव मोरे यांनी याबाबत तक्रार दिली असून ट्रॅक्टर चालक विशाल निवृत्ती दिवेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि १३) रविवारी रात्री दहा वाजता ऋषिकेश स्वप्नील व गणेश हे त्यांच्या दुचाकीवरून पाटस रस्त्याने दौंड कडे येत असताना हॉटेल स्वानंद जवळ ट्रॅक्टर चालक विशाल दिवेकर याने अचानक ट्रॅक्टर हळू केला. ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागे रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी ट्रॉलीला मागून धडकली यामध्ये तिघांनाही गंभीर स्वरूपाच्या दुखापती होऊन त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

अपघातग्रस्तांना मदत न करता व याची खबर पोलीस ठाण्यात न देता ट्रॅक्टर चालक निघून गेला. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ करत आहेत.

गणेश, ऋषिकेश आणि स्वप्निल हे तिघेही जीवलग मित्र होते. ऋषिकेश व स्वप्निल हे खाजगी नोकरी करत होते तर गणेश याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शरीरसौष्ठव कमावले होते व तो जिम ट्रेनर होता. तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकाच गावातील तीन उमद्या युवकांचा अशाप्रकारे अकाली मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. अनेकांनी या प्रकाराबाबत शोक व्यक्त केला आहे व पोलिसांनी अनेक वेळा सूचना करूनही कारखानदार व उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक रिफ्लेक्टर बसवण्यासारख्या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने ते अनेकांच्या जीवावर बेतल्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी तरुण मुलांनीही दुचाकीचा वेग आटोक्यात ठेवण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!