Just another WordPress site

मुंबईत अचानक पसरली गोवरची साथ, काय आहेत गोवरची लक्षण? गोवर किती धोकादायक आहे?

सध्या मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेल्या काही दिवसात गोवर आजाराचे अनेक रुग्ण आढळले. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सध्या सहा बालके ऑक्सिजनवर आहेत. गोवर रुबेलाच्या लसीकरणाकडे योग्य वेळी लक्ष न दिलेल्या मुलांमध्ये आजाराची तीव्रता वाढली तर न्यूमोनियाचा त्रास बळावू शकतो. त्यामुळे पालिकेसह राज्य सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची गरज बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केली. दरम्यान, गोवरचा प्रसार कसा होतो? गोवरची लक्षणं काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी 

१. मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे
२. गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे
३. सर्दी, खोकला, नाक वाहणं, जुलाब ही गोवरची लक्षणं
४. गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा एकच उपाय

 

​गोवर आजार काय आहे?

गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होऊ शकते. अतिशय लहान बालकांसाठी म्हणजे, ५ वर्षाखालील आणि प्रौढांसाठी म्हणजे, २० वर्षावरील लोकांसाठी गोवर हा प्राणघातक असू शकतो. या आजारांमध्ये उद्भवणाऱ्या अतिसार, न्युमोनिया आणि मेंदू संसर्ग या सारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होऊ शकतो.

 

गोवरचा संसर्ग सद्यस्थितीत वाढण्याची कारण काय?

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होते. विशेषत: लहान मुलांना घरातून बाहेर घेऊन जाताना पालक काळजी घेत होते. या काळात कोरोनावर भर असल्याने इतर आजारांचे लसीकरण मागे पडले आहे. वातावरण बदलामुळे गोवरची साथ दरवर्षी येतच असते. या वर्षी रुग्णांची संख्या जास्त आहे. लसीकरणाकडे झालेले दुर्लक्ष आणि बदलेले वातावरण हे गोवरचा संसर्ग वाढण्याचे कारण आहे.

 

गोवरची लक्षण नेमकी काय?

गोवरचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आहे. यामध्ये मुले चिडचिड करतात, जेवण करत नाही. त्यानंतर ताप येतो. शरीरावर लाल पुरळ येणं, सर्दी, खोकला, डोळे लाल होणं ही गोवरची लक्षणं आहेत. डोळ्यातून पाणी येणं, नाक वाहणं, जुलाब ही देखील गोवरची लक्षणे आहेत.

 

गोवर होऊ नये यासाठी उपाय काय?

गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. गोवरच्या दोन लसी घेतल्यानंतर त्याचा लगेच प्रभाव दिसून येतो. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करणं गरजेचं असतं. लस घेतल्यानंतर चार आठवड्यानंतर त्याचा प्रभाव जाणवतो. ताप आणि अंगावर पुरळ आल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे.

 

गोवरमुळे मृत्यू होण्याची कारणे काय?

ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा मुलांचे मृत्यू होतो. कुपोषण तसेच उपचाराला उशीर झाल्याने मुलांना न्युमोनिया, मेंदूमध्ये इन्फेक्शन यामुळे मृत्यू होतो. लस नसल्यामुळे मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे देखील मृत्यू होतो.

 

गोवर झाल्यावर घरच्या घरी तो बरा होतो का?

गोवरसाठी घरीच उपचार करू नये. याचे कारण म्हणजे गोवरप्रमाणे दिसणारे इतर आजार देखील आहे. त्यामुळे नेमका गोवर आहे की इतर दुसऱ्या प्रकारचा आजार हे डॉक्टरांना कळणार आहे. त्यामुळे अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.

 

गोवर किती धोकादायक?

गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!