Just another WordPress site

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते राजा बापट यांचे हृदयरोगाने निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी व मालिकांमधील कलाकार राजा (चंद्रकांत) बापट यांचे हिंदुजा रुग्णालयात हृदयरोगाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा (गौरी) व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांनी युनियन बँकेत अधिकारीपदावर नोकरी केली व तिथूनच ते निवृत्त झाले. ‘रंगायन’ संस्थेमार्फत त्यांची नाट्यसृष्टीशी ओळख झाली. यशोदा, हमीदाबाईची कोठी, शाकुंतल, जन्मदाता, पपा सांगा कुणाचे, शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केली. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकटी, जावई विकत घेणे आहे, नवरे सगळे गाढव, थोरली जाऊ, प्रीत तुझी माझी या मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. दामिनी, बंदिनी, झुंज, वहिनीसाहेब, आम्ही दोघं राजा राणी, मनस्विनी, या गोजिरवाण्या घरात, या सुखांनो या, वादळवाट, अग्निहोत्र, श्रावणबाळ रॉकस्टार या मराठी मालिकांमध्ये तसेच ढाई आखर प्रेमके, चूप कोर्ट चालू है आदी हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. अलिकडच्या काळात व्हेंटिलेटर चित्रपटातही त्यांचे दर्शन झाले होते. निवृत्तीनंतर दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये विविध उपक्रमांच्या आयोजनात ते कार्यरत राहिले. व्हायोलिन, बासरी, हार्मोनियमवादनाचा त्यांना छंद होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!