Just another WordPress site

“मै झुकेंगा नही…”; अमरावतीत झळकले आमदार बच्चू कडूंचे बॅनर, बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार?

अमरावती : अमरावती जिल्ह्यातलं राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलंय. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रकरण सरकारला आव्हान देण्यापर्यंत गेले. राणांनी आरोप मागे घेतले नाही तर सात-आठ आमदार आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिलं होतं. शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या दोघांच्या वादात मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, रवी राणा यांनी माफी मागितल्यानंतरही मै झुकेंगा नही, हा बाणा बच्चू कडू कायम ठेवला.

 

महत्वाच्या बाबी

१. अमरावती जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय
२. आमदार रवी राणांनी मागितली बच्चू कडूंची माफी
३. अमरावतीत झळकले आमदार बच्चू कडूंचे बॅनर
४. आ. रवी राणांना बच्चू कडूंनी बॅनरमधून डिवचलं?

 

अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर कडू आणि राणा यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आणि ‘राणा विरुद्ध कडू’ असा संघर्ष निर्माण झाला. या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली. ५० खोके कुणी घेतले आणि कुणी दिले याचे पुरावे द्यावेत अन्यथा १ नोव्हेंबरला व्हिडीओ बाहेर आणू, असा इशारा दिला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळा विचार करू असंही कडू म्हणाले होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणांकडून वादावर पडदा टाकण्यात आला. त्यांनी आपले आरोप मागे घेतले. बोलण्याच्या नादात माझ्याकडून काही शब्द गेले. त्यामुळे बच्चू कडू आणि काही मंत्री, आमदार नाराज झाले. पण माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी माफी मागतो, असं राणा म्हणाले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी मात्र सस्पेन्स कायम ठेवला. आपण अमरावतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करु आणि १ नोव्हेंबर रोजी भूमिका स्पष्ट करु, असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. आता त्यांच्या या विधानानंतर तयार झालेला सस्पेन्स अखेर आज संपण्याची शक्यता आहे. आज अमरावतीतील नेहरू मैदानावर बच्चू कडू यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून आमची भूमिका स्पष्ट करू, असं त्यांनी सांगितलं. या मेळाव्यापूर्वी लागलेल्या बॅनरची आता राज्यसभर चर्चा आहे. कडू यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमध्ये “मै झुकेंगा नही” असे बॅनर लावून आमदार रवी राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच व्यासपीठावरील एका मोठा बॅनरवर बच्चू कडूंचा एक फोटो अधिक चर्चेत आहे. या फोटोसमोर मोठा हातोडा दाखवण्यात आला. हजार कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यातून शिंदे-फडणवीस सरकारला नेमका काय संदेश देणार आहेत, याची चर्चा सुरु आहे.

बच्चू कडू यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह काल बैठक घेतली. यात कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विचार मांडल्याने बच्चू कडू सरकारमध्ये राहणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारमध्ये राहायचं आणि बाहेरून पाठिंबा द्यायचा, तसंच तटस्थ राहायचं असे विचार कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडले. आता या संदर्भात बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. बच्चू कडू आज अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

महत्वाचं म्हणजे, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी तरी मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे. त्यासाठीच हे दबावतंत्र असल्याची राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे बच्चू कडू यांची काय भूमिका असणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!