Just another WordPress site

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या कामाची कॅग चौकशी – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या कामाची कॅग चौकशी केली जाणार आहे, याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, कॅगचे ऑडिट होत असते आणि मागणी केल्यावर ते आता अधिक वेगाने होईल. त्या कामांत अनियमितता, गैरप्रकार, भ्रष्ट्राचार झाला असेल तर तो उघडकीस येईल. कॅगचं ऑडिट करणे कायद्याच्या दृष्टिनेही गरजेचे आहे. त्यामुळे ते होईल आणि त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांच्याही भूमिकेचे मी स्वागत करतो. कारण काहीतरी मतभेद झाल्यामुळे त्यांच्या तो वाद पेटला होता. पण राज्याचे कुशल नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयमाने हे प्रकरण हाताळले आणि त्यानंतर आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करीत आपले शब्द मागे घेतले, तर आमदार बच्चू कडू यांनीही शब्द मागे घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्रासाठी ही एक चांगली गोष्ट आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत आहेत. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोघांच्याही भूमिकेचे स्वागत केले आहे.

प्रकल्पांबाबत फक्त हवा करणे सुरु

राज्यात फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्यूल्याबाबत विचारले असता, या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले. वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा एअर बस हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. याबाबतीत बोलताना, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर राज्यात गेल्याच्या संदर्भात मी स्वतः उद्योग सचिवांशी चर्चा केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत. पण कागद कोणताही दाखवत नाही. शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या बैठकीचे मिनीट्स दाखवले कुणीही दाखवले नाहीत. टाटाने सरकारला कुठले पत्र दिलेले नाही. टाटाच्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत तत्कालीन उद्योगमंत्र्यांच्या बैठका झाल्या नाहीत. त्यांच्या सरकारने कुठले पत्र दिले नाही. एखाद्या एमआयडीसीसाठी अर्ज केला नाही. असे असताना अशा पद्धतीने त्यांनी हवा करणे सुरु केले की, त्याचे आश्‍चर्य वाटते, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

सत्ता गेल्यावर ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

आता उद्धव ठाकरे आरोप करत आहेत की, हे सरकार उद्योगाच्या संदर्भात नकारात्मक भूमिका घेत आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने जे निर्णय घेतले. यामध्ये त्यांना कुठलाही गैरप्रकार सापडू शकत नाही. ठाकरे अडीच वर्ष घराबाहेर निघाले नाहीत आणि आता बांधावर जात आहेत. बांधावरुन मदतीची मागणी करत आहेत. पण शेतकरी त्यांना प्रतिप्रश्‍न करत आहेत की, अडीच वर्षात तुम्ही काय केले. आमच्या सरकारने दिवाळीत आनंद शिधा वाटला. ७५ वर्षांवरील नागरिकांना बससेवेत १०० टक्के सवलत दिली, असे एकही काम त्यांच्याकडे सांगण्यासारखे नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!