Just another WordPress site

बीटी बियाण्याची लिकिंग; शेतकरी संकटात ! अधिकाऱ्यांची शोधमोहीम; कारवाई मात्र गुलदस्त्यात

अकोला : शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या बियाण्यासोबत खप नसलेले बियाणे लिकिंग (Licking the seeds०) करून विकण्याचा घाट जिल्हाभरातील बहुतांश कृषी केंद्र संचालकांनी चालविला आहे. किंबहुना, त्यांना मुख्य वितरकांनी तसे निर्देशच दिल्याचे पुढे आले आहे. याबाबत शिवसैनिकांनी बुधवारी आंदोलन करताच जिल्ह्यातील कृषी विभाग (Department of Agriculture) जागृत झाला. ठरल्याप्रमाणे कृषी सेवा केंद्रावर लिंकिंगची शोधमोहीमसुध्दा सुरु झाली. परंतु, अद्यापही केलेल्या कारवाया गुलदस्त्यात असून, शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे मिळणे दुरापास्तच आहे. (Licking of Bt seed; Farmers in crisis)

कषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी खरीप हंगामात ४ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास दीड लाख हेक्टरवर कपाशीची लागवड नियोजित करण्यात आली आहे. परंतु, संपूर्ण जून महिना कोरडा जाण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणांना आता पसंती दिली आहे. त्यानुसार ठरावीक बीटी बियाण्याला मागणी असल्यामुळे फावलेल्या कृषी सेवा केंद्र संचालकानी मुख्य वितरकांच्या म्हणण्यानुसार पाहिजे असलेल्या बियाण्यासोबत नको असलेले बीटी बियाणे घेण्याची सक्ती केली आहे.

याबाबतच्या अनेक तक्रारीसुध्दा शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले असता, काही कृषी अधिकाऱ्यांनी लिंकिंग होत असल्याला दुजोरासुध्दा दिला. परिणामी, संबंधित कृषी केंद्रावर आधीच कारवाई होणे अपेक्षित असताना ‘पाकीटबाज’ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोपही यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाणे वेळेत मिळावे आणि लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरही अद्याप कोण कोणत्या केंद्रावर कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती गलदस्त्यात आहे.

नियोजन डिसेंबरमध्येच
गतवर्षातील खरीप हंगामात झालेला पेरा, शेतकऱ्यांना मिळालेले उत्पादन यावरून पुढील हंगामात कोणत्या बियाण्याला मागणी राहणार याची माहिती बीटी कपाशी उत्पादित कंपन्यांना माहीत असते. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतात ते अनेक प्रयोगदेखील करतात. परंतु, यावर्षी पावसाळा लांबल्याने कंपन्या आणि कृषी विभागाचे नियोजन चुकले. पाहिजे नसलेले बियाणे अधिक तर शेतकऱ्यांना पाहिजे असलेले बियाण्यांचे पॅकेट्स कमी मिळाले. यामुळे मुख्यतः खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचा ठरावीक बीटी बियाण्यासाठी सुरु असलेला संघर्ष अजूनही सुरूच आहे.

जादा दरानेही विक्री
अजीत १५५ बीटी बियाण्याला सद्या शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर्षी सदर बियाण्याचे पॅकेट्स जवळपास ३० हजाराच्या संख्येने कमी आलेले आहेत. यामुळे काही कृषी केंद्रांनी या बियाण्यासाठी जास्तीची रक्कम घेण्याचा सपाटा सुरु केला असून, काहींनी या पॅकेटसोबत अजीत ५५ बीटी बियाण्याचे पॅकेट घेण्याबाबत शेतकऱ्यांना सक्ती केल्याची तक्रार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!