Just another WordPress site

आता भटक्या कुत्र्यांना खाऊपिऊ घालाल तर कारवाई होणार, हायकोर्टाचे फर्मान

एखाद्या व्यक्तीला भटक्‍या कुत्र्यांना रस्‍त्‍यावर खाऊ घालावे, असे वाटत असेल त्‍यांनी प्रथम त्‍या भटक्या कुत्र्याला घरी न्‍यावे. त्‍याची महापालिका अधिकार्‍यांकडे नोंदणी करावी. घरी नेण्‍याची तयारी नसेल तर किमान त्‍याला कुत्र्यांच्या निवारागृहात ठेवावे. येथे त्‍याच्‍यावर प्रेमाच वर्षाव करा, असे स्‍पष्‍ट करत कोणी भटक्या कुत्र्यांना रस्‍त्‍यावर खाऊ घालत असेल तर संबंधितांना योग्‍य दंड करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला आहे.

नागपूर शहरामध्‍ये भटक्या कुत्र्यांना वावर वाढला आहे. याप्रश्‍नी दाखल याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी व्‍हावा यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी उपाययोजना केल्‍या आहेत. मात्र काही नागरिकांच्या बेजबाबदार कृतीमुळे नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे”.

 

‘त्‍यांना’ दातृत्वाचे घातक परिणाम जाणवत नाहीत

स्वतःला भटक्या कुत्र्यांचे मित्र म्‍हणावणार्‍या नागरिकांना ते समाजाची किती मोठी हानी करत आहेत, याची जाणीव नाही. प्राणीप्रेमींनी दिलेल्या अन्‍नपदार्थांमुळे अनेक भटके कुत्रे उद्धट बनतात. ते रस्‍त्‍यावर येणार्‍या जाणार्‍यांसह विशेषतः लहान मुलांबद्दलच्या अधिक हिंसक बनतात, असे निरीक्षणही या वेळी खंडपीठाने नोंदवले.

त्यांनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे…

संबंधितांना समजून घ्‍यावे की फक्त खाऊ घालणे म्‍हणजे जबाबदारी घेणे असे होत नाही. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण करायचे असेल तर त्यांनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे. त्‍यांना घरी घेवून जावे. घरी घेवून जाणे शक्‍य नसेल तर किमान त्यांना चांगल्या श्वान निवारागृहात ठेवावे. महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे त्यांची नोंदणी करावी. त्यांची देखभाल, आरोग्य आणि लसीकरण करा, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

भटक्या कुत्र्यांची काळजी घेणारे नागरिक आपलं मूलभूत कर्तव्य पार पाडण्यास टाळाटाळ करतात. यामुळे रस्‍त्‍यावर भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित वाढ होत आहे. त्यामुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणे, उद्यान इत्यादी ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणार्‍या नियमानुसार दंड आकारण्‍यात यावा, असा आदेश खंडपीठाने दिला. प्राणी प्रेमींनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भटक्‍या कुत्र्यांचे वर्तन हे आक्रमक आणि अनियंत्रित असते. अधिकार्‍यांनी भटक्‍या कुत्र्यांना ताब्यात घेण्याचा विचार करावा, असेही निर्देश खंडपीठाने या वेळी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!