Just another WordPress site

रायगडमध्ये परतीच्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

रायगड : रायगड जिल्ह्यात सर्वत्र भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या गेले. मात्र परतीच्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी भात शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे भाताची उभी पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी भाताची रोपे जमिनीवर आडवी झाली. अशातच हवामान खात्याने पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून सतर्कतेचा इशारा दिला, त्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला.

 

महत्वाच्या बाबी

१. रायगड परिसरात परतीच्या पावसाचा हाहाकार
२. परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा
३. भात लागवडीचा खर्चही निघणं आता मुश्कील
४. सरकारकडून बळीराजाला आर्थिक मदतीची आशा

 

राज्यात यंदा काहीशा उशिरानेच दाखल झालेल्या पावसाने सप्टेंबर संपल्यानंतरही काढता पाय घेतला नाही. आधीच अनेक जिल्ह्यांना बसलेल्या पुराच्या तडाख्यामुळे मोठ्या क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असतानाच, राज्यात अनेक ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात बरसलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले. खरिप हंगामातील पिकांची काढणी अंतीम टप्प्यात असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला. राज्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसामुळं खरीपातील पिकांचे मोठं नुकसान झालं. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात जवळपास २ लाख २५ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली. दसऱ्यानंतर कोकणात भात कापणीला सुरुवात होते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण झाला. पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

काल रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळं भाताला कोंब आले आहेत. परिणामी बळीराजाचे मोठे नुकसान झालं. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या काही दिवसापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया गेल्यानं शेतकऱ्यांपुढं आर्थिक संकट उभे राहिलं. या परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. उभ्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रायगडमधील शेतकर्‍याने पावसाची उघाड मिळताच कापणीला सुरुवात केली. मात्र कापणी सुरु असतानाच जोरदार पावसाने झोडपल्याने माणगावमधील शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले.

पावसानंतर शेतात पाणी साचल्याने कापून ठेवलेले भाताचे पिक गोळा करून नेण्याची वेळ या शेतकर्‍यावर आली. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान, परतीच्या पावसामुळं भाताला कोंब आल्याने ते भात पीक निकृष्ट दर्जाचे झाले. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. कोकणात शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते. खरिपाची लागवड सोडली तर फारसे दुबार पीक होत नाही. अशा परिस्थितीत शेतातील उभे पीक नष्ट झाल्याने, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. भातशेती वर अगोदरच करपा आणि खोड किडा पडल्याने शेतीचे नुकसान झाले होते, तर त्यामध्ये आता पावसाची भर पडल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा संकटात सापडला. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करताहेत. दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झोळीत सरकार काही मदत टाकणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!