Just another WordPress site

ऑक्टोबरमधील पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मदतीचा हात; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विरोधी पक्षाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असताना राज्य सरकारने ऑक्टोबरमधील पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधीच्या सहाय्यानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. ऑक्टोबर २०२२ मधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती. मात्र, आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे ७५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत’, असे शिंदे म्हणाले.

आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरु असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर संपवावेत, असे निर्देश देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून-जुलैपासून सुरु असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या ४० लाख १५ हजार ८४७ शेतकऱ्यांना सुमारे ४ हजार ७०० कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त आणि दोनऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!