Just another WordPress site

सामनातून फडणवीसांची खरडपट्टी! तुमच्यावर संघाचे संस्कार ‘ते’ हेच म्हणावेत काय?

मुंबई: दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अडचणीत आले आहेत. सरकारचा हा निर्णय ठाकरे गटाच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता थेट चौकशीचे आदेश देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे गटाने या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांचे संस्कारच काढले आहेत.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे संस्कार काढण्यात आले आहेत. ११० कोटींचे भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे त्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे आणि भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नागपूरच्या भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फडणवीसांनी एसआयटी नेमायची होती. तसं केलं असतं तर फडणवीस यांचं चरित्र उजळून निघालं असतं, असा चिमटाही काढण्यात आला आहे.

या अग्रलेखातून शिंदे गटाच्या आमदारांवरही टीका केली आहे. आम्ही खोके घेतले असं खुद्द आमदार महेश शिंदे सांगत आहेत. मग या प्रकरणाची एसआयटी चौकशी का केली जात नाही? हा एसआयटी चौकशीचा विषय नाही का? असा सवाल करतानाच राज्य सरकारकडून गाडलेले विषय उकरून त्याची चौकशी लावली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

खोके सरकारने ज्यांना आज होलसेलात क्लीन चिट दिली त्या सगळ्यांचा आणि शंभर उंदरांचा फडशा पाडून काशीला पोहोचलेल्या ४० फुटीर बोक्यांचा आनंदही औटघटकेचाच ठरेल याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नागपुरातील थंडीत या बोक्यांचे आणि त्यांच्या खोके सरकारचे मेंदू गोठून गेले. भारतीय जनता पक्षाला हवे तेच शेवटी घडले व अधिवेशनात चिखलफेकीस उत्तेजन देऊन छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा ज्वलंत विषय मागे ढकलण्यात यश मिळवले. शिवरायांवर इतर विषयांनी कुरघोडी केली हे दुर्दैवच म्हणावे लागेल! ठग-पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!