मुंबई : कालीचरण महाराज हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आता आणखी एक वादग्रस्त विधान करून कालिचरण चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी देवी-देवता आणि महापुरुषांविषयी बोलून नवा वाद निर्माण केला आहे. “आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
“आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का?” असे सवाल कालीचरण महाराज यांनी केले आहेत.
तसेच पुढे बोलताना,“आपले सगळे देवी-देवता हिंसक आहेत. उद्देश देश, धर्मासाठी असेल तर खून करणे काही वाईट नाही,” असेही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
दरम्यान, यापूर्वी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. तसेच गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केले होते. याबाबतची एक व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल आहे.