Just another WordPress site

महान फुटबॉलपटू पेले यांच्याबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का? त्यांना पेले हे नाव कोणी दिलं?

महान फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालंय. जगातील सर्व देशातील फुटबॉल प्रेमींच्या मनात या महान खेळाडूने एक खास जागा केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १,३६३ सामने खेळले असून त्यांच्या नावावर तब्बल १,२८१ गोल करण्याचा विक्रम आहे. त्यांनी आपल्या देशाला तीन वेळा फिफा वर्ल्डकप जिंकून दिलाय. पेलेंच्या खेळाबाबत आणि त्यांच्या विक्रमांबाबत शेकडो किस्से जगभरात सांगितले जातात, पण त्यांच्या जीवनाबाबत अशा काही गोष्टीसुद्धा आहेत, त्या लोकांना फारशा माहीत नाहीत.

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ. या खेळाची लोकप्रियता वाढवण्यामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी मोठं योगदान दिलंय. त्यात पेलेंचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर येतं. चहाच्या दुकानात चहा विकण्याचं काम करत असताना एक दिवस आपण या शतकातील महान फुटबॉलपटू बनू असं त्यांना कधीच वाटलं नसेल. पण पेले यांनी फुटबॉल जगतात नवनवे विक्रम प्रस्थापित करत इतिहास घडवला. पेले हे घर खर्च चालवण्यासाठी चहाच्या दुकानात काम करत होते. त्यांना लहानपणापासून फुटबॉल खेळण्याची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांनी फुटबॉल खेळायला शिकवलं होतं. पेलेंच्या कारकिर्दीची सुरुवात साओ पाउलोच्या रस्त्यांपासून झाली होती. साओ पाउलोतील रस्त्यावर पेले सॉक्समध्ये पेपर भरून त्याचा फुटबॉल बनवायचे अन् खेळायचे. कारण, पेले यांचे वडील फुटबॉलचा खर्च उचलू शकत नव्हते. त्यामुळं पेलेंनी फुटबॉल किट खरेदी करण्यासाठी बूट पॉलिश करण्याचं कामही केलं.
पेले यांचा फुटबॉलचा प्रवास इंडोअर फुटबॉलपासून सुरू झाला. ते एका संघात सामील झाले. त्यानंतर त्यांच्या परिसरात इंडोअर फुटबॉल अत्यंत लोकप्रिय झाला. त्यांनी आपल्या भागातील फुटबॉलची स्पर्धाही जिंकली होती. पेले आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदाच चॅम्पियनशीप जिंकली होती. तेव्हापासून पेले यांचा महान फुटबॉलपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला. पेले यांच्याशी विषयी अनेक कथा आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्यांचे टोपण नाव. जे त्यांना स्वत:ला कधीही आवडलं नाही. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी दक्षिण ब्राझीलच्या ट्रेस कोराकोस येथे झाला. जन्मदाखल्यावर त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर रोजी झाला, अशी नोंद आहे. मात्र, अनेक वेळा मुलाखतीत त्यांनी ही चूक असल्याचं सांगितलं होतं. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की, पेले यांना हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकल्यानंतर मिळालेलं नाही. तर हे नाव त्यांना शाळेत असताना वर्गमित्रांनी दिलं होतं. या नावाचा अर्थ ना स्वत: पेले यांना कधी कळला. ना त्यांच्या मित्रांना माहिती होता. पेले यांना त्यांचे हे टोपण नाव कधीच आवडलं नाही. त्यांना नेहमी हे वाटत होतं की, हे पोर्तुगालमधील बेबी टॉक सारखं आहे. पेलेंची जगभर वेगवेगळ्या नावांनी ओळख आहे. चीनमध्ये पेलेंना एल-पेलिग्रा हे नाव त्याला देण्यात आलंय. तर फ्रान्सवासीयांनी ‘ब्लॅक ट्यूलिप’ असे नाव पेलेंना सन्मानपूर्वक दिलंय. याशिवाय ‘दि नॉव्हेल्टी’, ‘सॉकर किंग’, ‘दि किंग’, ‘ब्ल्यू पार्क’, ‘ब्लॅक सीजर’, ‘फॅबुलस’, ‘डिव्हाईन’ अशा अनेक नावांनी पेलेंना संबोधिले जातं. मात्र, पेलेंचं खरं नाव आहे, एड्सन अरांतेस दो नासिमेंतो…

पेले यांच्यामुळे रोखले गेले गृहयुद्ध

१९६० च्या दशकात पेले यांचा सँटोस FC जगातील सर्वांत लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक होता. याचा फायदा घेऊन हा संघ जगभरात अनेक मैत्रीपूर्ण सामने खेळायचा. असाच एक सामना नायजेरियात १९६९ रोजी खेळवण्यात आला होता. त्यावेळी नायजेरियामध्ये गृहयुद्ध सुरू होतं. इतिहासकार ग्यूहरमें गॉरचे यांच्या मते, ब्राझीलचे खेळाडू आणि अधिकारी सुरक्षेच्या कारणावरून चिंताग्रस्त होते. यामुळे दोन्ही पक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. या कहाणीच्या सत्यतेवरून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पेले यांची पहिली आत्मकथा १९७७ साली प्रकाशित झाली होती. त्यामध्ये याबाबत काहीच लिहिलेलं नव्हतं. पण ३० वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या दुसऱ्या आत्मकथेत या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. या एका सामन्यामुळे नाजरेरियातील गृहयुद्ध थांबू शकतं, असं खेळाडूंना सांगण्यात आलं होतं, असं पेले यांनी आत्मकथेत लिहिलं. “ही गोष्टी पूर्णपणे खरी आहे किंवा नाही, याबाबत मला स्पष्ट माहीत नाही. पण आम्ही तिथं होतो, तोपर्यंत कुणीही त्याठिकाणी घुसखोरी करणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती,” असं पेलेंनी लिहिलं आहे.

पेलेसाठी इंग्लंडचा राजाही नमला

सन १९६३ मध्ये राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांनी ब्राझीलला भेट दिली तेव्हा त्यांनी पेलेचा खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. खेळ संपल्यानंतर ड्यूकना पेलेचे अभिनंदन करायचे होते तेव्हा मोठा पेच निर्माण झाला की, आता प्रिन्सनी स्वत: मैदानावर जावे, की फुटबॉलसम्राटाने प्रिन्सपुढे यावे? मात्र, थोर मनाच्या प्रिन्स फिलिप यांनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: मैदानावर जाऊन पेलेचं अभिनंदन केलं… तेव्हा पहिल्यांदाचा इंग्लंडचा राजा कुणापुढं नमल्याचं जगानं पाहिलं होतं.

राष्ट्रपती पदासाठी प्रयत्न

१९९० साली पेले यांनी राजकारणात उतरण्याबाबत सांगितलं होतं. आपण १९९४ च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले होते. राजकारणात दाखल होऊन पेले १९९५ ते १९९८ पर्यंत ब्राझीलचे क्रीडामंत्री होते. पण ते राष्ट्राध्यक्ष बनू शकले नाहीत. ब्राझीलच्या खेळाडूंना क्लब बनवण्याचं स्वातंत्र्य देणारा कायदा निर्माण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पेले खेळत असताना ज्या गोष्टी शक्य नव्हत्या. त्यांना पेले यांनी मंजुरी मिळवून दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!